Thu, Apr 18, 2019 16:03होमपेज › Pune › सामाजिक कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने

सामाजिक कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 31 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी

पोलिसांनी देशातील नामवंत वकील, लेखक, विचारवंत आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अटक केेलेल्या सर्व मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करावी, संविधानाचे संरक्षण करावे आदी मागण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

मोओवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत देशभरात विचारवंतांना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. विचारवंतांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांना जिवे मारण्याचा हास्यास्पद आरोप ठेवून काही तथाकथित पत्रांच्या आधारावर त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच देशातील दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकर्‍यांच्या हक्कांसाठी लढणार्‍या आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांबद्दल आवाज उठवणारी हे सर्वजण असल्याने त्यांचा आवाज आणि विचार दडपण्यासाठी सरकारने अटकेची कारवाई केली आहे, अशी टिका करण्यात आली. 

या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टी, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, आंबेडकर राइट स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, भारतीय महिला फेडरेशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारिप बहुजन महासंघ, भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान, दलित आदिवासी अधिकार मंच, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मिळून सार्‍याजणी, पुरुष उवाच, लोक स्वतंत्रता संघटना, लोक सांस्कृतिक मंच, लोकशाही उत्सव समिती, लोकशाहीवादी जनता दल, प्रबुद्ध भारत, राष्ट्र सेवा दल, रिपब्लिकन भारत, सम्यक विद्यार्थी आंदोलन, स्वराज अभियान, सत्यशोधक प्रबोधन महासभा, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, विचारवेध आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी प्रा. अंजली आंबेडकर, विद्या बाळ, किरण मोघे, सुभाष वारे, साधना ददीच, किशोर ढमाले, सुनील सुखतनकर, नितीश नवसागरे तसेच अनेक पुरोगामी कार्यकर्ते उपस्तिथ होते. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवर टीका यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.