Sun, May 26, 2019 11:10होमपेज › Pune › मला स्मार्टफोनचे व्यसन; डॉक्टर औषध द्या

मला स्मार्टफोनचे व्यसन; डॉक्टर औषध द्या

Published On: Feb 27 2018 1:58AM | Last Updated: Feb 27 2018 1:58AMपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

स्मार्टफोन वापराचे व्यसन लागलेले रोज एक ते दोन मुले ससून मध्ये उपचरासाठी दाखल होत आहेत. त्यांच्यावर रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातील डॉक्टरांकडून उपचार केले जातात. यामध्ये 12 ते 18 वयोगटातील मुलांचा अधिक सहभाग आहे. स्मार्टफोन ही दुधारी तलवार आहे. गुगलद्वारे माहिती घेणे, संदर्भ शोधणे, मित्र, नातेवाईकांच्या संपर्कात राहणे या कामांपुरता ठराविक वेळेसाठी उपयोग केला तर ठीक; नाहीतर त्यावर गेम खेळणे, तासंतास चॅटिंग करणे, सोशल नेटवर्किंग साईटवर वेळ घालवणे, यासाठी तासंतास वेळ घातल्यास त्याचा उपयोग न होता तोटाच होतो. 

ससून रुग्णालयात स्मार्टफोनचा अतिरिक्‍त वापर करण्याचे व्यसन लागलेले 8 ते 10 मुले आठवड्याला येत आहेत. यामध्ये 12 ते 18 वयोगटातील मुलांचे प्रमाण जास्त असून, पाच तासांपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरणे, झोप न येणे, चिडचिड करणे, ही लक्षणे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये सुरवातीला मोबाईलवर चॅटिंग करणे आणि नंतर पोर्नोग्राफी बघणे या दोन गोष्टींवर जास्त वेळ मुले देत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारच्या मुलांना ससूनमधील मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठविण्यात येते. तेथील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर या मुलांचा स्वभाव आणि त्याचे लक्षणे पाहून त्याच्यावर उपचार करतात.  

यामध्ये तो स्वभावाने आक्रमक असणार्‍या मुलांना औषधोपचार देण्यात येतो. तसेच गरज पडल्यास त्यांना ‘बिहेव्हियरल थेरपी’ (वर्तणुक थेरपी), कुटूंबियांशी कसे वागायचे याविषयी समुपदेशन करण्यात येते. इतकेच नव्हे तर आईवडिलांचेही समुपदेशन करण्यात येते. यामध्ये मुलाशी कसे वागावे, त्याला टोचून बोलु नये, समजून सांगावे, असे सांगण्यात येेते. 


स्मार्टफोनचे व्यसन लागण्यास पालक जबाबदार

मुलांना खरोखर गरज आहे का हे पाहूनच त्याच्या हातात स्मार्टफोन पालकांनी हातात द्यावा. पण मुलगा- मुलगी कामात व्यत्यय आणतात म्हणून त्यांना नादी लावण्यासाठी त्याच्याकडे स्मार्टफोन देतात. यामुळे मुलांना त्याचे व्यसन लागते. तसेच कधी-कधी मुले स्मार्टफोन सफाईदारपणे हाताळत असल्याचेही पालकांना कौतुक वाटते, यातुनही मुलांना ही सवय लागते आणि नंतर त्याला त्यापासून परावृत्‍त करणे अवघड बनते. म्हण्ाून पालकांनी दक्षता घेणे आवशक आहे.

डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार विभाग, ससून रुग्णालय