Tue, Jul 16, 2019 10:08होमपेज › Pune › संचालक मंडळ मात्र अंधारात; आज अहवाल सादर करणार

‘स्मार्ट सिटी’च्या कामांमध्ये परस्पर बदल

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 08 2018 1:33AMपुणे : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी योजनेकडून तब्बल 155 कोटींच्या विकसकामांमध्ये संचालक मंडळांची मान्यता न घेता अनेक परस्पर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे कामांची बिले अदा करण्यात येऊ नयेत, अशी मागणी स्मार्ट सिटी संचालक मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता कामांमधील बदलांचा माहिती अहवाल शनिवारी (दि. 8) होणार्‍या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार असून, या परस्पर बदलांवरून वादंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

 केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सात वेगवेगळे घटक शहरात विविध स्वरूपाची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये डिजिटल माहिती फलक (व्हीएमडी), पर्यावरण सेन्सर्स अशा विविध कामांचा समावेश आहे. यामधील बहुतांश कामे ‘एल अ‍ॅण्ड टी’ या कंपनीकडे आहे. या कंपनीला घातलेल्या अटींमध्ये  या कामांसाठी तत्कालीन स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सवलत दिली; तसेच  निविदा प्रक्रियेतील अटी-शर्तीनुसार जे साहित्य नमूद करण्यात आले होते, त्या व्यतिरिक्त इतर साहित्याचा वापरण्यात आला. त्याचबरोबर स्मार्ट एलिमेंट्स निश्‍चित केलेल्या जागी न बसविता परस्पर अन्य ठिकाणी त्यांची बदलण्यात आली. कामांमधील या सगळ्या बदलांसाठी संचालक मंडळाची कोणतीही मंजुरी घेण्यात आलेली नव्हती. त्यातच  ही कामे 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करत कंपनीने त्याच्या बिलांची मागणी स्मार्ट सिटीकडे केली आहे. मात्र, कामांमध्ये जे परस्पर बदल करण्यात आले आहेत, त्यांना संचालक मंडळांची मान्यता घेतली गेली नसल्याने ही मान्यता घेतल्याशिवाय बिले दिली जाऊ नयेत, तसेच बदलांचा अहवाल संचालक मंडळासमोर सादर करावा, अशा सूचना मंडळाने दिल्या होत्या. त्यानुसार, हा बदलांचा अहवाल मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून, त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.