होमपेज › Pune › सिंहगडावर जाणार्‍या वाहनांची होणार तपासणी

सिंहगडावर जाणार्‍या वाहनांची होणार तपासणी

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 12:31AMपुणे : प्रतिनिधी

सिंहगड किल्ल्यावर जाणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसर्‍या बाजूला प्रशासकीय बाबीवर गडावर अपेक्षित अशी सुरक्षा पुरविली जात नाही. त्यामुळे सिंहगड किल्ल्याची सुरक्षितता धोक्यात असून, त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, आगामी काळात शासकीय गाड्यांसह सर्वच गाड्यांची कसून तपासणी होणार असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

सिंहगड किल्ल्यावरील दूरदर्शनच्या एका अधिकार्‍याचा व्हिडिओ गेल्याच आठवड्यात व्हायरल झाला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित अधिकार्‍यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यामुळे अखेर सिंहगड किल्ल्याच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा समोर आला आहे. त्यातच सिंहगड किल्ल्यावर काही खासगी मालमत्ता असल्याने सरकारकडूनही त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे.

वन विभागाच्या ताब्यामध्ये सिंहगड किल्ल्यावर 21 हेक्टर जमीन आहे. सध्याच्या परिस्थितीत वन विभागाच्या वतीने गडाच्या पायथ्यावर टोलनाका उभारण्यात आला आहेे. गडावर जाण्याआधी खासगी वाहनचालकांची तपासणी केली जात असली, तरी ती वरच्यावर केली जाते. याबाबत वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एम. पी. भावसार म्हणाले, वन विभागाकडून शुल्क आकारले जात असले, तरी शासकीय वाहनांची तपासणी केली जात नाही. परंतु या प्रकरणानंतर आता सर्वच वाहनांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्‍त गडाच्या पायथ्याशी डिजिटल बोर्डही उभारण्यात आले आहेत. आगामी काळात सर्वांबाबत कडक नियम केले जातील.