Thu, Sep 20, 2018 04:17होमपेज › Pune › शिवसृष्टी प्रकल्पाची स्थिती महिनाभरानंतरही ‘जैसे थे’

शिवसृष्टी प्रकल्पाची स्थिती महिनाभरानंतरही ‘जैसे थे’

Published On: Mar 05 2018 1:57AM | Last Updated: Mar 05 2018 1:00AMपुणे : प्रतिनिधी

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेबाबत झालेला तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चांदणी चौकातील बीडीपी आरक्षित 50 एकर जागा देण्याची घोषणा केली. ही जागा देण्यासंबंधीची कार्यवाही पंधरा दिवसात पूर्ण केली जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले होते. मात्र आता या बैठकीला महिना होत आला असतानाही काहीच निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे ‘शिवसृष्टी’बाबत पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्यास मंजुरी असतानाच तेथे मेट्रोचा डेपोही प्रस्तावित करण्यात आला. त्यामुळे तिढा निर्माण झाला होता. त्यातच राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांनी शिवसृष्टीसाठी आग्रही भूमिका घेत मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे हा पेच सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात पालिकेतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात कचरा डेपोची जागा मेट्रो डेपोसाठी देतानाच चांदणी चौकालगतची जैववैविध्य उद्यानाची 50 एकर जागा शिवसृष्टी प्रकल्पासाठी देण्याची घोषणा केली. तसेच ही जागा विशेष बाब म्हणून संपादित करण्यासाठी आणि तिचा मोबदला निश्‍चित करण्याची कार्यवाही पुढील पंधरा दिवसात केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. 

पालिका हद्दीतील 23 गावांमधील बीडीपी आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन निर्णय घेऊन तो राज्य शासनास कळवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला येत्या मंगळवारी (दि.6) महिना होत आला असतानाही बैठकीत ठरलेल्या एकाही निर्णयावर कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे मेट्रोचा मार्ग मोकळा करून राज्य शासनाने पुन्हा एकदा शिवसृष्टी प्रकल्पाचे घोंगडे भिजत ठेवल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.