Thu, Jul 18, 2019 12:26होमपेज › Pune › ओएलएक्सवरून स्कूटीची जाहिरात देऊन अनेकांना गंडा

ओएलएक्सवरून स्कूटीची जाहिरात देऊन अनेकांना गंडा

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:25AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

ओएलएक्स साईटवर स्कूटीची विक्री करण्याची जाहिरात करून नागरिकांना गंडा घालणार्‍या दोघांना सायबर सेलने अटक केली. त्यांनी पुण्यातील पाच; तर राज्यातील 30 जणांची अशा पद्धतीने फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल,  डोंगल, वेगवेगळ्या बँकेची 13 डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती सायबर सेलचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
साजीद मोहंम्मद शेख (वय 37, रा. जोगेश्वरी वेस्ट, मुंबई) आणि नासीर आब्बास शेख (वय 40, रा. मुंब्रा, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सायबर भामट्यांकडून सध्या ऑनलाईन खरेदी-विक्री करणार्‍या वेबसाईटवर विक्री तसेच वेगवेगळी माहिती देऊन गंडा घालण्याचे प्रकार वाढत आहेत.

दरम्यान खडक परिसरातील एका व्यक्तीला सेकंडहॅण्ड स्कूटी खरेदी करायची होती. त्यामुळे ते ओएलएक्सवर स्कूटी पाहत होते. त्या वेळी त्यांना आरोपींनी टाकलेली जाहिरात दिसली. त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क केला. त्या वेळी त्यांना पैसे जमा केल्यानंतर डिलिव्हरी केली जाईल, असे सांगितले. त्यासाठी त्यांना एका खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी 18 हजार रुपये भरले. पण, त्यांना स्कूटी मिळाली नाही. त्यानुसार खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा सायबर सेलने तपास केला. तांत्रिक गोष्टींच्या आधारे आरोपींची माहिती काढली. त्या वेळी आरोपी मुंबई व ठाणे परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन सापळा रचत दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी तक्ररदार यांना फसविल्याचे समोर आले.