होमपेज › Pune › देशाच्या राजकारणाचे चित्र बदलण्यासाठी  एकत्र येण्याची वेळ : पृथ्वीराज चव्हाण

देशाच्या राजकारणाचे चित्र बदलण्यासाठी  एकत्र येण्याची वेळ : पृथ्वीराज चव्हाण

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 29 2018 12:44AMपुणे : प्रतिनिधी 

देशाच्या राजकारणाचे चित्र बदलण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे तयार करावी लागणार आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत संभाजी काकडे यांनी मार्गदर्शन करावे. त्यांनी घरामधून कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केल्यास तसे घडल्यास देशाचे चित्र वेगळे दिसू शकेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. याकरिता त्यांनी घरामधून कार्यकर्त्यांच्या बैठका घ्याव्यात, असेही याप्रसंगी सुचवले. लोकनेते संभाजीराव काकडे गौरव समितीच्या वतीने काकडे यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चव्हाण बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील होते. या वेळी मंचावर महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. बाबा आढाव, रत्नाकर महाजन, बाळासाहेब शिवरकर, प्रकाश आंबेडकर, संभाजी काकडे, कंठावती काकडे, दादा जाधवराव, अनंतराव थोपटे, बुवा नलावडे, डॉ. तोडकर, समितीचे अध्यक्ष प्रकाश भोईटे उपस्थित होते. या वेळी काकडे यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पहार घालून विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. आढाव यांनी सर्वांना महात्मा फुलेंची ‘सत्य सर्वांचे आदीघर’ ही प्रार्थना म्हटली. या वेळी महापौर टिळक, हर्षवर्धन पाटील, दादा जाधवराव, अनंतराव थोपटे आणि डॉ. बाबा आढाव यांची भाषणे झाली. चव्हाण यांनी बोलताना काकडे कुटुंबासोबत असलेल्या घनिष्ठ संबंधांना उजाळा दिला. 

डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले,  माणूस म्हणून काकडे यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग आहे. त्यांनी कोणताही अहंकार बाजूला ठेवून काम केले. सत्काराला उत्तर देताना काकडे म्हणाले, कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना हे दुहीचे द्योतक असल्याचे मत मांडले. नोटबंदी आणि जीएसटीने देशाचे वाटोळे केले. शेतकर्‍यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. देशातील एक टक्का लोकांकडे 73 टक्के संपत्ती असेल, तर आपण कुठे चाललोय, याचा विचार करावा लागेल. सत्काराच्या निमित्ताने नवी ऊर्जा मिळाली असून, मला दीर्घायुष्यापेक्षाही समाजाची सेवा करण्याची आणखी संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली. 

बापट यांनी बोलताना जनतेवर प्रेम करणारा असा लोकप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांशी त्यांचा उत्तम संपर्क आहे. अशा भाषेत त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.  सदानंद शेट्टी यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.  बुवा नलावडे यांनी आभार मानले.