Sun, Jul 21, 2019 16:25
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › बातम्या पाहून धक्‍का; पोलिसांकडे स्वत: हजर

बातम्या पाहून धक्‍का; पोलिसांकडे स्वत: हजर

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:48AMपुणे : प्रतिनिधी 

मी जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षणासाठी गेले होते. प्रसारमाध्यमांमधील माझ्यासंदर्भातील बातम्या पाहून मला धक्‍काच बसला. त्यानंतर मी स्वत: पोलिसांकडे गेले होते. पोलिसांनी व विविध तपास यंत्रणांनी माझी चौकशी केल्यानंतर त्यांना काहीच संशयास्पद सापडले नसल्याचे त्यांनी  सांगितले.  माझ्या भूतकाळाचा  वर्तमान व भविष्यावर परिणाम होत आहे, असे जम्मू-काश्मीरमध्ये संशयावरून चौकशी करण्यात आलेल्या पुण्यातील अठरा वर्षीय तरुणी सादिया शेख हिने पत्रकार परिषदेत सांगितले. 

या घटनेमुळे सादिया शेख व तिच्या आईला ज्या प्रसंगाला सामोरे जावे लागले त्याची माहिती त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मूलनिवासी मुस्लिमचे अंजुम इनामदार, अ‍ॅड. दिनेश गिते आदी उपस्थित होते़  सादिया म्हणाली, “2015 मध्ये मी सोशल मीडियावरील ग्रुपच्या माध्यमातून काही चुकीच्या लोकांच्या  संपर्कात आले होते़ सुदैवाने एटीएस व मौलवींच्या मदतीने त्यातून बाहेर पडले; पण या घटनेमुळेच पुण्यात शिकणे कठीण झाल्याने  नर्सिंगच्या कोर्ससाठी मी जम्मू-काश्मीरला जाण्याचे ठरवले. त्यानुसार मी व आई 15 जानेवारीला दक्षिण काश्मीरला गेलो़  तेथील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला़ त्या काळात मैत्रिणीने राहण्याची सोय केली होती़  

त्यानंतर अचानक 23 जानेवारीपासून माझ्याबाबत वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागले की, पुण्यातील तरुणी 26 जानेवारीच्या परेडमध्ये किंवा परिसरात आत्मघातकी हल्ला करण्याची शक्यता आहे़; त्यामुळे मी स्वत: पोलिसांकडे गेले. पोलिस व इतर यंत्रणांनाही सहकार्य केले.  माझ्या भूतकाळातून बाहेर पडून भविष्याकडे पाहत आहे. मात्र भूतकाळाचा परिणाम माझ्या वर्तमान व भविष्यावर होत असल्याची खंत तिने व्यक्त केली.”

आपण आत्मघातकी हल्ला करणार आहोत, असे वृत्त समजल्यावर मला धक्काच बसला़  मी शिक्षणासाठी जम्मूू-काश्मीरमध्ये आले आहे. मात्र, असे वृत्त आल्याने मला काहीच सुचत नव्हते. मी आईशी पुण्यात संपर्क साधला. त्या वेळी तिने घरी पोलिस येऊन गेले़  त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे मी कोठे आहे याची माहिती देण्यास सांगितल्याचे आईने सांगितले. मी माझ्या महाविद्यालयाच्या प्रशासनाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र सुटीमुळे त्यांच्याशी काही संपर्क झाला नाही. 26 जानेवारीला काश्मीरमधील मोबाईल सेवा बंद झाल्यामुळे कोणाशी संपर्क साधू शकत नव्हते़; त्यामुळे मी स्वत: पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला़  श्रीनगरला टॅक्सीने जाताना वाटेत चेकपोस्टवर थांबविण्यात आले़  तेव्हा पोलिसांना त्या वृत्तातील मुलगी आपणच असल्याचे सांगितले. मी पुण्याहून आले असून, माझे नाव सादिया शेख असल्याचे पोलिसांना सांगितले़  त्यानंतर पुढील काही दिवस सर्व तपास यंत्रणांनी आपली सखोल चौकशी केली़; परंतु त्यांना आपल्याकडे काहीही संशयास्पद मिळाले नाही़  त्यामुळे त्यांनी आपल्याला आईकडे सुपूर्त केल्याचे सादिया शेख म्हणाली. 

याबाबत सादियाची आई म्हणाली, याअगोदरचा अनुभव वाईट होता. तसेच सादियाशी संपर्क होत नसल्याने मी पूर्णत:  गोंधळून गेले होते; त्यामुळे जेव्हा पुणे पोलिसांनी सादियाचा ठावठिकाणा विचारला तेव्हा त्यांना आपण ती शिक्षणासाठी बाहेरगावी गेली असल्याचे सांगितले़; पण अधिक माहिती देण्यास नकार दिला होता़  या संपूर्ण प्रकारामुळे आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. अंजुम इनामदार यांनी सांगितले की, मुलीचा कोणताही सहभाग नसताना व काहीही तथ्य नसताना केवळ एका इशार्‍यावरून झालेल्या मीडिया ट्रायलमुळे  शेख कुटुंबीयांची या प्रकरणात बदनामी झाली आहे़  त्यामुळे त्यांना आता बाहेर फिरणे मुश्कील झाले आहे़  आमची संघटना त्यांच्या पाठीशी असून, त्यांच्याशी नियमित संपर्कात राहणार आहोत़  याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही दोन दिवसांत बैठक घेऊन करणार आहोत,  असे अ‍ॅड. गिते यांनी सांगितले़