Thu, Jun 20, 2019 02:10होमपेज › Pune › दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना बंगेराचे ट्रेनिंग

दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना बंगेराचे ट्रेनिंग

Published On: Sep 02 2018 1:38AM | Last Updated: Sep 02 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी 

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोन आरोपी अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांच्यासह यापूर्वी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सचिन अंदुरेला आणि शरद कळसकरला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण बंगेरानेच दिल्याची माहिती सीबीआयने न्यायालयात दिली. तर अमित दिगवेकर गेल्या 15 वषार्र्ंपासून गोवा आश्रमात राहात असताना डॉ. विरेंद्रसिंह तावडे याच्या जवळून संपर्कात असल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी याप्रकरणी दिगवेकर आणि बंगेराला 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर अंदुरेच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. 

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषणचे (सीबीआय) सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी न्यायालयात सांगितले की, राजेश बंगेरा हा कर्नाटक येथील शासकीय कर्मचारी असून शिक्षण खात्यात कार्यरत होता.  तसेच तेथील एका आमदाराचा  स्वीय सहाय्यक म्हणूनही तो काम करत होता. 

 बंगेरा हा गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी असून अंदुरेच्या पोलिस कोठडीत केलेल्या तपासामध्ये त्यानेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील शूटर  कळसकर आणि  अंदुरेला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे समोर आले असून त्याचा या हत्येच्या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. बंगेराकडे त्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात, कुठे पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिले तसेच शिक्षणासाठी शस्त्रसाठा कोणी पुरविला याचाही तपास करायचा आहे. प्रशिक्षण देण्याबरोबरच हत्येच्या कटातील एक आरोपी असून त्याने डॉ. विरेंदसिंह तावडे याच्याबरोबर हा कट केल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

तर, अमित दिगवेकरच्या पोलिस कोठडीबाबत युक्‍तीवाद करताना ढाकणे यांनी सांगितले, दिगवेकर हा हिंदू जनजागृती संघाचा कार्यकर्ता आहे. तो आणि सीबीआयला ताबा हवा असलेला आरोपी अमोल काळे हे दोघे जवळून डॉ. तावडेच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिगवेकर हा गौरी लंकेश हत्येतील एक आरोपी असून  अंदुरेच्या तपासामध्ये त्याने डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी रेकी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिगवेकर हा देखील कटातील एक आरोपी असून त्याने गुन्ह्याचा कट कसा केला याचा तपास करायचा आहे. अशा प्रकारे विविध बाबी न्यायालयासमोर मांडताना अ‍ॅड. ढाकणे यांनी दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. 

याला बचाव पक्षाचे वकील समीर पटवर्धन यांनी प्रतिवाद करताना सांगितले की, सीबीआय प्रत्येक वेळी नवीन थिअरी डॉ. दाभोलकर खून प्रकरणाच्या तपासात मांडत आहे. सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात, फरार असलेले सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दोन हल्लेखोर असल्याचे सांगितले. तशाप्रकारे दोन प्रत्यक्षदर्शींचे घटनास्थळावरील जबाब त्यांनी नोंदवून न्यायालयात सादर केले आहेत. 

डॉ. दाभोलकर खून प्रकरणात पाच वर्षे होऊन काही तपास न लागल्याने सामाजिक संस्थांचा दबाव तसेच उच्च न्यायालयाने याप्रकरणी तपास यंत्रणेवर ताशेरे ओढल्याने, नवीन थिअरीअंतर्गत  कळसकर आणि अंदुरे यांना हल्लेखोर दाखवून दोनचे चार शूटर सीबीआयने चुकीच्या पध्दतीने केले आहेत. कॉ. पानसरे हत्येत डॉ. तावडे आणि समीर गायकवाड यांना न्यायालयाने यापूर्वीच जामिनावर मुक्‍त केले असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना  वकील ढाकणे यांनी सीबीआयने केवळ स्केचच्या आधारे विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची नावे दोषारोपपत्रात हल्लेखोर म्हणून समाविष्ट केल्याचे सांगितले. तेच या प्रकरणात आरोपी आहेत असे आम्ही कधी म्हटले नाही, असे सांगत  ते या प्रकरणात हल्लेखोर असू शकतात, असा उल्लेख दोषारोपपत्रात केल्याची भूमिका मांडली.  

--------------------------------------------------
पिस्तुलाच्या अनुषंगानेही सीबीआयचा तपास 

गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा  या तिघांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने सहभाग असल्याची बाब केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाली आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या  एका आरोपीने 7.65 एमएमचे कन्ट्रीमेड पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे  अंदुरेला दिली होती. 11 ऑगस्ट 2018 रोजी अंदुरेनेही हे पिस्तूल आणि काडतुसे त्याचा मेहुणा शुभम सुरळेला औरंगाबाद येथे दिली. दरम्यान, सीबीआयने सुरळेच्या घरी तपास केल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या तपासमध्ये ही पिस्तूल आणि 3 काडतुसे त्याने त्याचा मित्र रोहित राजेश रेगे याच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती. ती पिस्तुले सीबीआयने रोहित रेगेच्या विघ्नहर्ता बिल्डिंग, धावणी मोहल्ला, औरंगाबाद येथून जप्त केली आहेत, त्याअनुषंगानेही सीबीआय तपास करत आहे.