Sun, Mar 24, 2019 04:11होमपेज › Pune › विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्राध्यापकांचे ‘हेल्प डेस्क’

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्राध्यापकांचे ‘हेल्प डेस्क’

Published On: Mar 05 2018 1:56AM | Last Updated: Mar 05 2018 12:54AMपुणे ; प्रतिनिधी 

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांचे गेल्या 16 महिन्यांचे थकीत वेतन मिळावे यासाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे सिंहगडमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आंदोलक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ सुुरू केले आहे. त्यामुळे संस्थेत शिकणार्‍या विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सिंहगडच्या प्राध्यापकांनी गेल्या दोन महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे सिंहगड संस्थेत शिकणार्‍या सुमारे 80 हजार विद्यार्थ्यांच्या गेल्या दोन महिन्यापासून तासिका बंद आहेत. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही; त्यासाठी सिंहगड संस्थेच्या प्रत्येक  हाविद्यालयासमोर प्राध्यापक ‘हेल्प डेस्क’ सुरू करतील, असे आश्‍वासन प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना दिले होते. तसेच विद्यापीठाने अंतर्गत परीक्षा पुढे ढकलण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यानुसार आंदोलक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘हेल्प डेस्क’ सुरू केले असल्याची माहिती प्राध्यापक सचिन शिंदे यांनी दिली. 

सचिन शिंदे म्हणाले की, संस्थेच्या वडगाव, नर्‍हे, कोंढवा, वारजे, लोणावळा आणि आंबेगाव कॅम्पसवर विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्प डेस्क’ सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी आपल्या अभ्यासक्रमातील समस्या विचारत असतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सामाजिक जबाबदारीतून प्राध्यापकांनी हा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, जोपर्यंत संस्थेवर प्रशासक नेमला जाणार नाही, तसेच थकीत वेतन देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.