होमपेज › Pune › बीआरटीमधून वाहनांची घुसखोरी वाढली

बीआरटीमधून वाहनांची घुसखोरी वाढली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

‘पीएमपी’च्या बसेस जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बीआरटी मार्गातून खासगी वाहनांची घुसखोरी मागील दीड महिन्यापासून पुन्हा जोरात सुरू झाली आहे. त्यामुळे ‘पीएमपी’च्या बसेस या मार्गातून चालविताना चालकास चांगलीच कसरत करावी लागत आहे. हडपसर, येरवडा, आळंदीरोड, पिंपरी-चिंचवड भागात बीआरटी मार्ग आहेत. या मार्गातून केवळ ‘पीएमपी’च्या बसेस जाण्याची सोय करण्यात आली आहे. या मार्गामुळे बसेस इच्छित स्थळी लवकर पोहचविण्यासाठी उपयोग होत आहे. यामुळे प्रवाशांनासुद्धा कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचणे सोयीस्कर होत आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या बीआरटी मार्गातून खासगी वाहने चालक सुसाट नेत आहेत.

मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नव्हते. अर्थात काही ठिकाणी खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. मात्र तरी देखील त्यांना न जुमानता बिधनास्त वाहने घुसवली जात होती. ही बाब लक्षात घेऊन ‘पीएमपी’चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी बीआरटी मार्गातून खासगी वाहने घुसडणा-या चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात येरवडा बीआरटी मार्गावर संध्याकाळच्या वेळी वाहतूक पोलिस आणि पीएमपी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांची तयार करण्यात आलेल्या टीमने जोरदार कारवाई करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे दररोज किमान 50 ते 75 वाहनांवर कारवाई करण्यात येत होती.

केवळ कारवाई करून ही टीम थांबत नव्हती तर ‘बीआरटी’मधून घुसखोरी केल्यामुळे संबंधित वाहनचालकास दंड ठोठावण्यात येत होता. त्याचप्रमाणे वाहने जप्त करणे, नंतर त्याचा लिलाव करणे या योजनासुद्धा करण्यात आल्या होत्या. या नियमामुळे खासगी वाहनचालकांनी ‘बीआरटी’मधून वाहनांची घुसखोरी करण्याचा चांगलाच धसका घेतला होता. मुंढे यांच्या कार्यकालात विशेषत: येरवडा आणि हडपसर या बीआरटी मार्गावर मोठ्या प्रमाणावर खासगी वाहन चालकांवर कारवाई करून दंड ठोठावण्यात आला होता.

‘पीएमपी’चे तत्कालीन अध्यक्ष मुंढे यांची बदली होताच बीआरटी मार्गात घुसखोरी करणार्‍या खासगी वाहन चालकांवर कारवाई करण्याचे प्रमाण खुप कमी झाले. सध्या तर ही कारवाई जवळजवळ बंद असल्याचेच दिसून आले आहे. त्यामुळे खासगी वाहन चालक बिधनास्तपणे बीआरटी मार्गातून वाहने नेत असताना दिसून येत आहे. या वाहनचालकांना बीआरटी मार्गावर असलेले सुरक्षारक्षक अडविण्याचा प्रयत्न करतात. मात्र संबंधित वाहन चालक मुजोरी करीत सुरक्षा रक्षकांच्या अंगावरच वाहने घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक देखील बीआरटी मार्गातून एखाद्या खासगी वाहनचालकाने घुसखोरी केली तर त्यांना अडविण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून या मार्गावरून पुन्हा खासगी वाहन चालक सर्रासपणे वाहने नेत आहेत. याबाबीकडे प्रशासनसुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. 
 

 

tags : pune,news,Private, vehicles, from, BRT ,route, Continue,


  •