Tue, Jul 23, 2019 10:31होमपेज › Pune › सहा रुपयांचा सलाईन कॉक 106 रुपयांना

सहा रुपयांचा सलाईन कॉक 106 रुपयांना

Published On: Mar 05 2018 1:57AM | Last Updated: Mar 05 2018 1:04AMपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

कंपन्यांकडून सहा रुपयांना विकत घेण्यात येत असलेला सलाईनचा कॉक रुग्णांना 106 रुपयांना विकला जात असल्याचा धक्‍कादायक लुटीचा प्रकार समोर आला आहे. रुग्णांसाठी लागणार्‍या किरकोळ वस्तूंच्या (कंज्यूमेबल्स) किमतीमध्ये 10 ते 18 पट वाढ करून खासगी रुग्णालये जवळपास 1735 टक्क्यांपर्यंत नफा लाटत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे ही लूट चव्हाट्यावर आणणारे ‘राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण’चे(एनपीपीए) प्रमुख भूपेंद्र सिंग यांना हटविण्यात आले आहेे. त्यांना का हटविण्यात आले याचे केंद्र सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी पुण्यातील एका डॉक्टरांच्या संघटनेनेे केली आहे. मास्क, सलाईन कॉक, सिरींज, हातमोजे आदी किरकोळ वस्तूंमधून सर्वसामान्यांची कशी लूट केली जाते, हा प्रकार उदाहरणांसहित ‘एनपीपीए’ने समोर आणला आहे. यामुळे खासगी हॉस्पिटलची लूट चव्हाट्यावर आली आहे.

डेंग्यूची लागण झाल्याने दिल्‍लीतील 7 वर्षीय बालिकेचा गुरुग्राम येथील फोर्टीस रुग्णालयात सप्टेंबर 2017 मध्ये मृत्यू झाला होता. फोर्टीसने तिच्या उपचारासाठी तब्बल 16 लाख रुपये बिल आकारले. तिच्या कुटुंबीयांनी हे बील जास्त आकारल्याची तक्रार ट्विटरवर केली होती. त्याची दखल केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी घेत चौकशीचे आदेश दिले होेते. यानंतर आणखी तीन कुटुंबांंनी देशभरातील खासगी हॉस्पिटल्सविरुद्ध भरमसाट बिल आकारल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार ‘एनपीपीए’ने या चार हॉस्पिटलच्या बिलांची तपशीलवार चौकशी केली. त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णासाठी वापरलेल्या वैद्यकीय वस्तूंची खरेदी बिले आणि प्रत्यक्षात रुग्णाला त्याचे किती बिल लावले याची तपासणी केली. त्याचा अहवाल ‘एनपीपीए’ने त्यांच्या संकेतस्थळावर 20 फेब्रुवारीला प्रसिद्ध केला आहे. 

या अहवालामध्ये सलाईन कॉक, सिरींज, हातमोजे, गोळ्या-औषधे, शरीरात वापरायचे इम्प्लांट याद्वारे रुग्णालयांनी 100 टक्क्यांपासून 1700 टक्क्यांपर्यंतचा नफा लाटल्याचे नमूद केले आहे. यामध्ये एका रुग्णाला सलाईन लावण्यासाठी ‘रॉमसन’ कंपनीचे तीन मार्गिकेचे 39 कॉक वापरले. विशेष म्हणजे त्याची खरेदी किंमत 5 रुपये 77 पैसे असताना बिलावर त्याची किंमत 106 रुपये होती. हॉस्पिटलने हे 39 कॉक केवळ 225 रुपयांमध्ये खरेदी केले. पण त्याचे रुग्णाकडून तब्बल 4 हजार 134 रुपये वसूल केले. 

हाच प्रकार इतर वैद्यकीय   उपकरणांबाबतही घडला आहे. पण सर्वाधिक लूट किरकोळ वस्तूंद्वारे करण्यात आल्याचे समोर आले आहे.  या अहवालावरून ‘एनपीपीए’च्या अधिकार्‍यांनी निष्कर्ष काढले आहेत. यामध्ये शासनाने किंमत नियंत्रित केलेल्या औषधांचा वापर केवळ 4.10 टक्के करण्यात आला, तर शासनाचे नियंत्रण नसलेल्या औषधांचा उपयोग 25.67 टक्के इतका करण्यात आला. याचाच अर्थ हॉस्पिटलनी प्रचंड नफा कमविण्यासाठी डॉक्टरांनी महागडी औषधे रुग्णांना लिहून दिली, अशा टिप्पणी ‘एनपीपीए’चे उपसंचालक अनंत प्रकाश यांनी केली आहे.