Tue, Jun 25, 2019 22:08होमपेज › Pune › सहपोलिस आयुक्त बोडखे यांना राष्ट्रपती पदक

सहपोलिस आयुक्त बोडखे यांना राष्ट्रपती पदक

Published On: Aug 15 2018 1:21AM | Last Updated: Aug 15 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक सेवा केल्याबद्दल राज्यातील 51 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये पुण्याचे पोलिस सहआयुक्त शिवाजी बोडखे, पीएमआरडीएचे उपायुक्त सारंग आवाड यांचा समावेश आहे. तसेच, गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राज्य कारागृहातील चार जणांस राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. येरवडा कारागृहातील एकाचा सहभाग आहे. पोलिस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल महाराष्ट्रातील  पोलिसांना 8 शौर्य पदके,  3 राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40  पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशातील 942 पोलिस अधिकारी अणि कर्मचार्‍यांना पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. 

शिवाजी बोडखे यांनी चंद्रपूर येथे कार्यरत असताना नक्षलविरोधी अभियान राबविले होते. तर, लातूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना भूंकपानंतर भूकंपग्रस्तांना मदत, त्यांचे पुनर्वसन आणि परिसरातील सुव्यवस्था सांभाळले होते. या कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. तसेच, सारंग आवाड 1996 मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून सांगलीतील इस्लामपूर येथे रुजू झाले. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागात ते अधीक्षक होते तसेच पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यांनी बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणे तसेच वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी उपक्रम राबविले होते.  आवाड यांनी सांगली व लाचलुचपत विभागात उल्लेखनीय काम केले आहे. श्रीकांत पाठक हे पुणे पोलिस दलाच्या विशेष शाखेत उपायुक्त होते.