Mon, Jul 22, 2019 13:10होमपेज › Pune › उपनिरीक्षकांच्या चुका आता वरिष्ठांना भोवणार

उपनिरीक्षकांच्या चुका आता वरिष्ठांना भोवणार

Published On: Mar 25 2018 1:51AM | Last Updated: Mar 25 2018 1:27AMपुणे :अक्षय फाटक

पोलिस दलात दाखल झाल्यानंतर परीविक्षाधीन कालावधीत (प्रोबेशनरी पिरीयड) उपनिरीक्षकांकडून कामात होणार्‍या चुका आणि कसुरी आता वरिष्ठांना भोवणार असून, संबंधित वरिष्ठांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत. त्यामुळे आता एक वर्षाच्या परीविक्षाधीन काळात उपनिरीक्षकांकडून चुका आणि कामात कसूर होऊ न देण्याची काळजी वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे.

राज्य पोलिस दलात स्पर्धा परीक्षेतून दरवर्षी अनेकजण पोलिस उपनिरीक्षक होतात. पोलिस दलात आल्यानंतर त्यांना प्रथम एक वर्ष नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण अकॅडमी येथे ट्रेनिंग दिले जाते. त्याठिकाणी त्यांना सकाळी 9 ते रात्री 9 असे तबल 12 तास प्रशिक्षण होते. पिटी परेडपासून पोलिस दलात नेमके कसे काम चालते; तसेच एखाद्या ठिकाणी गोंधळ होऊन गर्दी (मॉब) झाल्यास त्याला कसे सामोरे जायचे वा शांत करायचे आणि पोलिस दलातील शस्त्र यासोबतच कायद्याबाबत प्रशिक्षण दिले जाते.

एक वर्षाचे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर संबंधित उपनिरीक्षकांना परीविक्षाधीन कालावधी (प्रोबेशनरी पिरीयड) म्हणून पोलिस ठाणे; तसेच विविध विभागांमध्ये नियुक्त केले जाते. याठिकाणीही एक वर्ष काम करतात. त्यावेळी त्यांना न्यायालयीन, रुग्णालय कामकाज तसेच केस डायरी, आठवडा डायरी, एखादी घटना घडल्यानंतर त्याचा पंचनामा आणि पोलिस ठाण्यात चालणारे काम याचे प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान, 1980 पूर्वी नवीन उपनिरीक्षकांना दोन वर्ष नाशिक पोलिस प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिले जात होते.

मात्र, त्यानंतर त्यांना कामाची पद्धत समजावी; तसेच एक वर्ष शिकण्यासाठी हा नियम तयार करण्यात आला. त्यानुसार उपनिरीक्षकांना एक वर्ष परीविक्षाधीन काम करतात. या कालावधीत त्यांना एकूणच पोलिस दलातील व पोलिस ठाण्यांमध्ये चालणारे कामकाज व कार्यपद्धती समजून आणि शिकून घेता येते. मात्र, परीविक्षाधीन कालावधीत त्यांच्याकडून अनवधानाने किंवा पूर्ण माहिती नसल्याने कामात चुका होतात. अशावेळी त्यांच्यावर शिस्तभंगाची व इतर कारवाई केली जाते. परंतु, या उपनिरीक्षकांच्या परीविक्षाधीन कालावधीत त्यांच्या पोलिस ठाण्यांचे वरिष्ठांवर कारवाई केली जात नाही. या कालावधीतील उपनिरीक्षकांना मार्गदर्शनाची जबाबदारी ही वरिष्ठांची असते. त्यामुळे यापुढे उपनिरीक्षकांच्या चुकांबद्दल वरिष्ठांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत.
 

 

tags : pune,news,Police, force, Sub-inspector,Mistakes, in work,