Fri, Jul 19, 2019 07:07होमपेज › Pune › शहरात प्लास्टिक बंदी पालिका यशस्वी करणार का?

शहरात प्लास्टिक बंदी पालिका यशस्वी करणार का?

Published On: Mar 25 2018 1:51AM | Last Updated: Mar 25 2018 1:41AMपुणे  : प्रतिनिधी

राज्य शासनाने गुढीपाडव्यापासून संपूर्ण राज्यात प्लास्टिकच्या पिशव्यांसह थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी घातली आहे. परंतु, त्याबाबतचा अध्यादेश आला नसल्याचे कारण पुढे करत पुणे महापालिका प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. मात्र,प्लास्टिक बंदीचा अध्यादेश शुक्रवारी रात्रीच जारी झाला असल्याचे समोर आले असून शहरात प्लास्टिक बंदी पालिका प्रशासन शहरात यशस्वी करणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

महापालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असताना राजरोशपणे सर्वच दुकांनामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जात होत्या. पालिका अधिकार्‍यांच्या आशीर्वादामुळे शहराच्या उपनगरांमध्ये प्लास्टिक तयार करण्याच्या कंपन्या तेजीत सुरू होत्या. वापरावर बंदी आणली जाते, मात्र त्या वस्तू उत्पादन करणार्‍या कंपन्यांवर कारवाई केली जात नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने गुढीपाडव्यापासून संपूर्ण राज्यात प्लास्टिकच्या पिशव्यांसह थर्माकोल, प्लास्टिकपासून तयार केलेले ताट, कप्स, वाट्या, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थांच्या पॅकींगसाठी वापरण्यात येत असलेल्या प्लॅास्टिकच्या वस्तूंना बंदी घातली आहे. याकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

शहरातील कारवाईसंदर्भात पालिका अधिकार्‍यांना विचारणा केल्यानंतर बंदीचा अध्यादेश आलेला नाही. कारवाई करण्यास गेल्यानंतर संबंधितांकडून याबाबत विचारणा केल्यानंतर अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे शासनाचा अध्यादेश आल्यानंतर कारवाई जोरदार केली जाईल असे सांगत, कारवाईची टाळाटाळ केली जात होती. बंदी संबंधीचा अध्यादेश शुक्रवारी रात्री उशिरा आल्याने आत्ता तरी पालिका प्रशासन आपली कारवाई तीव्र करणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  

यासंदर्भात बोलताना पालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख आणि पालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप म्हणाले, पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा केलेल्या व्यापार्‍यांना, उत्पादकांना त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक महिन्याची (23 एप्रिलपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. राज्य सरकारने प्लॅास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याची कडक अंमलबजावणी करण्यास पालिका प्रशासन करणार आहे. 

सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर तातडीने बंदी घालण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष करणार्‍या नागरिकांना दंडला सामोरे जावे लागणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  प्लास्टिक पिशव्यांचा तसेच बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर, विक्री किंवा साठा केल्याचे आढळल्यास संबंधितांना 5 ते 25 हजार रुपयांच्या दंड होणार आहे. 
 

 

tags : pune,news,Plastic, bags, banned,Success ,pune, Municipal, administration,