Thu, Jun 27, 2019 00:25होमपेज › Pune › ‘भोगा कमळाची फळे’ म्हणण्याची वेळ आणू नका...

‘भोगा कमळाची फळे’ म्हणण्याची वेळ आणू नका...

Published On: Mar 25 2018 1:52AM | Last Updated: Mar 25 2018 12:49AMपुणे  :प्रतिनिधी

शहरातील मोठमोठे मॉल आणि मल्टिफ्लेक्स थिएटरला मोफत पार्किंग दिले जात असताना, दुसरीकडे मात्र पार्किंग धोरणाच्या नावाखाली सत्ताधारी मंडळी पुणेकरांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ता कोणाचीही असो, पुणेकरांचे हित जपणे गरजेचे आहे. त्यामुळे पे अ‍ॅण्ड पार्किंग धोरण प्रमुख पाच रस्त्यांवरही राबवू नये, या धोरणाच्या माध्यमातून सत्ताधार्‍यांकडून गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘भोगा कमळाची फळे, असे म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आणू नका, असा घणाघात महापालिकेतील विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर केला, तर हे धोरण पुणेकरांच्या हिताचे असल्याने भविष्यात ते राबविण्यास आम्ही प्रयत्नशील असल्याने भाजप नगरसेवकांनी ठणकावून सांगितले.

शहरातील खासगी वाहनांना रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्याच्या नावाखाली संपूर्ण शहरात ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ धोरण राबविण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला होता. प्रशासनाने तयार केलेल्या पार्किंग धोरणाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ते शुक्रवारी पालिकेच्या मुख्य सभेसमोर ठेवण्यात आले होते. या धोरणास सर्व स्तरातून झालेला विरोध आणि पक्षातील नगरसेवकांची नाराजी यामुळे मूळ प्रस्तावात मोठे फेरबदल करून सत्ताधार्‍यांनी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास पार्किंग धोरणास उपसूचनेसह मंजुरी दिली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि नगरसेवक सुनील कांबळे यांनी दिलेल्या उपसूचनेमुळे मूळ प्रस्तावाला बगल देण्याचा काहीसा प्रयत्न झाला आहे.

उपसूचनेच्या बाजूने 58 मते पडली, तर विरोधात फक्त 17 मते पडली.  तत्पूवी पालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपला आणि पालिका प्रशासनाला चांगलेच सडकून काढले. मेट्रोला अनुदान हवे असेल तर शहरात पार्किंग धोरण राबवा, असे आदेश वरून आल्याने सत्ताधार्‍यांनी पुणेकरांचे हित न पाहता हे धोरण आणले आहे. या धोरणामुऴे पार्किंग माफिया निर्माण होणार आहेत. दिशाभूल करणारी उपसूचना मांडण्यात आली आहे. या उपसूचनेमुळे मेट्रो अडचणीत येणार आहे. सत्ताधार्‍यांच्या भूलथापांना पुणेकर बळी पडणार नाहीत, असे म्हणत विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला. पालिका आयुक्त वारंवार पुणेकरांचा वाईटपणा का घेतात, कळत नाही.

शहरातील विविध वाहनतळ गुन्हेगारांकडून चालविली जातात. हे धोरण राबविल्यानंतर वसुलीसाठी गुन्हेगारांनाच कामाला ठेवले जाणार आहे, त्यामुळे शहरात गुन्हेगारांचे पुनर्वसन होईल, अशी टीका दीपक मानकर यांनी केली. या धोरणामुळे खासगी वाहनांची संख्या कमी होईल, असा जावईशोध कोणी लावला, असा प्रश्‍न उपस्थित करत सुभाष जगताप यांनी सत्ताधार्‍यांवर टीकेची झोड उठवली. हे धोरण पुणेकरांवर अन्याय करणारे असल्याने ते आम्ही नाकारले होते. सत्तांतर झाल्यावर पुन्हा आयुक्तांनी हे आणले. आम्ही अंत्यविधी केलेल्या धोरणाचे भूत आयुक्त पुन्हा पुणेकरांच्या मानगुटीवर बसवत असल्याची टीका जगताप यांनी केला. 

या धोरणामुळे पुणेकरांवर जिझिया कर लादला जात आहे. पुणेकरांना मरण यातना देऊ नका, असे मत प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले. एकमहिना पुढे ढकललेला प्रस्तावर कुणाचा फोन आल्याने घाई गडबडीने मंजुर करण्यात आला. या धोरणामुळे महापौरांना बाहेर ताटकाळावे लागले, हे दुदैवी आहे. ‘भोगा कमळाची फळे, असे म्हणण्याची वेळ पुणेकरांवर येऊ नये, असे शिवसेना गटनेते संजय भोसले म्हणाले. गेली 11 वर्षात पालिकेत जेवढी आंदोलने पाहिली नाहीत तेवढी आंदोलने या वर्षात पाहिल्याचे मनसेचे वसंत मोरे यांनी नमुद केले. 

पालिका प्रशासनाने शहरात ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आजही उपनगरातील रस्ते विकसित झालेले नाहीत. उपनगरांमध्ये रस्ते करण्याचे सोडून पार्किंग शुल्क लावण्याचा चुकीचा घाट घातला आहे. हे अत्यंत चुकीचे असून आमचा त्यास विरोध असल्याचे नगरसेवक सुनिल टिंगरे म्हणाले.  सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, वाहतुक पोलिसांचा अभिप्राय घेऊनच कोणत्या रस्त्यांवर पे अ‍ॅण्ड पार्क धोरण राबवायचे हे ठरविले जाणार आहे.

हे धोरण पुणेकरांच्या फायद्याचे असून सर्वांचे मत विचारात घेऊन आणि अभ्यास करून हे धोरण भविष्यात शहरात राबविले जाईल. देशात आणि राज्यात मंत्रीपदे घ्याची, सत्ता भोगायची आणि पालिकेत भाजपवर टीका करायची, ही शिवसेनेची दुटप्पी भुमीका योग्य नाही, असा पलटवारही भिमाले यांनी केला. गोपाळ चिंतल यांनी प्रशासनावर आणि विरोधकांवर निशाना साधला. महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीत सामिल होण्यास नकार दिल्याच्या कारणाने राणी भोसले यांनी विरोधकांवर टीका करत पार्किंग धोरणाचे समर्थन केले.