Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Pune › पवारांनी दोन समाजात दरी निर्माण केली : डॉ. सुषमा अंधारे 

पवारांनी दोन समाजात दरी निर्माण केली :डॉ.अंधारे

Published On: Jul 18 2018 4:58PM | Last Updated: Jul 18 2018 6:29PMपुणे : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चे मराठवाड्यात निघत असताना मोर्च्यांमध्ये कोठेही ऍट्रॉसिटी कायद्याचा उल्लेख नव्हता. हे मोर्चे पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू होताच मोर्चांमधून ऍट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याची मागणी होऊ लागली. यामागे जाणताराजे म्हणून परिचीत असलेल्या शरद पवार यांचा हात आहे. पवारांनी कारण नसताना दलित अत्याचार विरोधी (ऍट्रॉसिटी) कायद्याबाबत गोंधळ निर्माण करून दोन समाजामध्ये दरी निर्माण केली, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यां व साहित्यिक डॉ. सुषमा अंधारे यांनी केला. पश्चिमेला शिकार करण्यासाठी पूर्वेला नेम धरणार्‍यांमधील व्यक्तीचे नाव शरद पवार असल्याचा टोलाही अंधारे यांनी पवार यांना लगावला. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी, कामगार सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ऍट्रॉसिटी कायद्याच्या शिथिलतेमुळे जातियवादी मनुवाद्यांचे अन्याय अत्याचार वाढले आहेत का? या विषयावर महाचर्चेचे आयोजन केले होते. या महाचर्चेमध्ये डॉ. अंधारे बोलत होत्या. या महाचर्चेत गोवा विधानसभेचे माजी उपसभापती शंभू बांदेकर, ज्येष्ठ साहित्यीक रतनलाल सोनग्रा, कायदेतज्ज्ञ ॲड अंजली पाटील, ॲड. राहिल मलिक आदींनी सहभाग घेतला. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लहू कानडे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे भगवान वैराट, प्रवीण बाराथे आदी उपस्थित होते. 

डॉ. अंधारे म्हणाल्या,  ऍट्रॉसिटी कायदा संपूर्ण देशात आहे, मग राज्यातील मराठा समाजालाच का या कायद्याची भिती वाटते कळत नाही. कर नाही त्याला डर का ? इतर समाज घटकांना या कायद्याची भिती का वाटत नाही. राज्‍यातील सर्व सत्ताकेंद्र पिढ्यान पिढ्या मराठा समाजाकडे आहेत. तरीही या समाजाचा राजकीय अनास्थेमुळे म्हणावा तेवढा विकास झाला नाही. स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी पवारांसारखे नेते ऍट्रॉसिटीच्या विरोधात समाजाला भडकवत आहेत.  

भिमा कोरेगांव येथील हिंसाचारापासून लक्ष विचलीत करण्यासाठी भिडे गुरुजींकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यांनी समोरासमोर चर्चा करण्यासाठी वेळ आणि ठिकाण कळवावे, आम्ही उत्तार देण्यास समर्थ असल्याचे आव्हानही डॉ. अंधारे यांनी भिडेंना दिले. ऍट्रॉसिटी कायद्याच्या शिथिलतेमुळे जातियवादी मनुवाद्यांचे अन्याय अत्याचार वाढले आहेत. याचे प्रमाण यापुढे वाढत जाणार असल्याने आपण सर्वांनी एक होऊन त्याचा प्रतिकार करणे गरजेचे असल्याचेही डॉ. अंधारे यांनी सांगितले. 

बांदेकर म्हणाले, मनुवादाने अतिशुद्र ही संकल्पना मांडून समाजात उच-निचता निर्माण केली. ‘ऍट्रॉसिटी’चे बीज याच मनुवादी प्रवृत्तीमध्ये आहे. पीडित, शोषित आणि वंचित घटकांनी एकत्र येऊन दबावगट निर्माण केला पाहिजे. रतनलाल सोनाग्रा, लहू कानडे,  ऍड. अंजली पाटील यांनीही आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान वैराट यांनी केले. तर प्रताप शिर्के यांनी सूत्रसंचालन केले.