Wed, Apr 24, 2019 20:13होमपेज › Pune › तेलबिया उत्पादकांना पामतेल दरवाढीने दिलासा

तेलबिया उत्पादकांना पामतेल दरवाढीने दिलासा

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

देशातील शेतकर्‍यांना तेलबिया लागवडीकडे आकर्षित करत, लागवडीचे क्षेत्र वाढावे व त्यांच्या उत्पादित मालाला चांगले दर मिळावे, याउद्देशाने पामतेलाच्या आयात शुल्कात 14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. परिणामी, पामतेलावरील आयात शुल्क 33 टक्क्यांवरून 44 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारात प्रतिपंधरा किलोमागे पामतेल 50 रुपयांनी, तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेल 20 रुपयांनी महागल्याची माहिती तेलाचे व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी दिली़ यामुळे तेलबिया उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात कच्च्या पामतेलावर 30 टक्के तर रिफाईंड पामतेलावर 40 टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1 मार्चपासून त्यामध्ये 14 टक्क्यांनी वाढ करत अनुक्रमे 44 ते 54 टक्क्यांपयर्र्ंत ते वाढविण्यात आले. दरम्यान, आयात शुल्कावर आणखी दहा टक्के सरचार्ज आकारून कच्च्या पामोलिन तेलावर 48.4 टक्के व रिफाईंडवर 59.4 टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. त्यामुळे, बाजारात पामतेलाचा 15 किलोंच्याा डब्याचा भाव 1 हजार रुपयांवरून 1 हजार 50 रुपयांवर पोहोचला आहे.

पामतेलावर वाढविण्यात आलेल्या आयात शुल्काचा परिणाम सोयाबीन व सूर्यफूल तेलांच्या दरातही झालेला दिसून येत आहे. बाजारात सोयाबीन तेलाचा दर 1 हजार 250 वरून 1 हजार 270 रुपये आणि सनॉवर 1 हजार 170 वरून 1 हजार 190 रुपयांवर पोहोचला आहे. घाऊक बाजारात पामतेलाची दरवाढ झाल्याने पामतेल किरकोळ बाजारात सात रुपयांनी महागले असून ग्राहकांच्या खिशाला झळ सोसावी लागणार आहे़ 

पेट्रोलियम पदाथार्र्ंनंतर देशात खाद्यतेलाची सर्वात मोठी आयात होते. यामध्ये, प्रामुख्याने इंडोनेशिया व मलेशिया येथून पामतेल, ब्राझील, अर्जेंटिना युक्रेन  येथून सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. खाद्यतेलांच्या आयातीमध्ये पामोलिन तेलाचा वाटा तब्बल 60 ते 65 टक्के होता. गेल्या काही वर्षांमध्ये तेलबियांना हमीभावापेक्षाही कमी दर मिळू लागल्याने शेतकर्‍यांकडून तेलबिया लागवडीकडे दुर्लक्ष होऊ लागले. परिणामी, तेलबियांचे क्षेत्र घटून देशाला मोठ्या प्रमाणात पामतेल आयात करावे लागत होते.

या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना तेलबियांकडे प्रोत्साहित करत तेलबियांचे क्षेत्र वाढून शेतकर्‍यांना चांगला दर मिळविण्याचे हेतूने आयात शुल्क वाढीचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.  केंद्र सरकारने पामतेलाच्या आयात शुल्कात ऑगस्ट महिन्यापासून तीन वेळा वाढ केली आहे़  मागील वाढ ही नोव्हेंबर महिन्यात केली होती़  सरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी यापूर्वीच गहू, साखर, कडधान्य आणि तेलबियांच्या आयात शुल्कात वाढ केली आहे़  त्यापूर्वी आयात करण्यात येत असलेल्या सोयाबीन व पामतेलाच्या प्रतिकिलोमध्ये 10 ते 12 रुपये तर सूर्यफूल आणि पामोलिन तेलामध्ये 13 रुपयांचा फरक होता. आयात शुल्क वाढविल्याने त्यामधील दरी कमी होण्यास मदत होणार असल्याचेही गुजराथी यांनी सांगितले.