Fri, Jul 19, 2019 20:29होमपेज › Pune › पीएमआरडीए कडून स्वस्त घरे

पीएमआरडीए कडून स्वस्त घरे

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी 

केंद्र शासनाने नागरिकांना स्वस्त दरात घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा (पीएमएवाय) आरंभ केला आहे. ही योजना पीएमआरडीए आणि विकासक सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वांवर राबविण्यात येणार आहे.  शासन निर्णय दि. 8 डिसेंबर 2017 नुसार महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाद्वारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्र प्रधानमंत्री आवास योजना - शहरी (पीएमएवाय-शहरी) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पुणे महानगर क्षेत्रात स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

सन 2022 पर्यंत पुणे जिल्ह्यासाठी 219075 घरांची बांधणी करण्याचे उद्दिष्ट आहे.  पुढील 4 वषार्र्ंत मोठ्या प्रमाणावर परवडणार्‍या घरांची निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाने दि. 11 जाने. 2018 रोजी शासन निर्णयाद्वारे आठ प्रतिकृतींची घोषणा केली आहे. यामध्ये शासकीय, सार्वजनिक व खासगी जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्याची व्यवस्था केलेली आहे.  खासगी जमिनींवर परवडणार्‍या घरांसाठी (क्षेत्रफळ : 300-600 चौ.मी.) कमी उत्पन्न गट (एल.आय.जी) व आर्थिक दुर्बल गट (इ. डब्ल्यू. एस.) यांचेसाठी पीएमआरडीएच्या हद्दीत गृहनिर्माण प्रकल्प विकसक पीपीपी तत्त्वावर राबवू शकतील. 50% घरांच्या किमती म्हाडाच्या नियमानुसार निश्चित करण्यात येतील व उर्वरित घरांच्या किमती बाजारभावानुसार ठरवल्या जाणार आहेत.

पीपीपी तत्त्वामुळे स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देणे अधिक सोपे होणार आहे. इच्छुक विकासक दि. 6 मार्च 2018 पर्यंत या निविदेमध्ये सहभागी होऊ  शकतील. दरम्यान, नागरिकांकडून अर्ज स्वीकृती पीएमआरडीएमध्ये करण्यात येईल. अर्जदारांपैकी पात्र लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारतर्फे एकूण 2.5 लाख रुपये इतके अनुदान देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी व विकासकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात येत आहे.