Fri, Apr 26, 2019 03:19होमपेज › Pune › तीन महिन्यात सहा ‘पीएमपी’ खाक

तीन महिन्यात सहा ‘पीएमपी’ खाक

Published On: Jan 30 2018 2:19AM | Last Updated: Jan 30 2018 12:17AMपुणे : शिवाजी शिंदे / पुष्कराज दांडेकर

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएमएलच्या सहा बसेस आगीत जळून खाक झाल्या आहेत. तर दीड वर्षाच्या कालावधीत या सहा  बसेस सह सुमारे तेरा बसेस अचानकपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. दरम्यान नोव्हेंपारपासून मागील तीन महिन्यांत ऐन हिवाळ्याच्या कालावघीत सहा पीएमपीएमएल बसेसना अचानक आग लागून पीएमपीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यात रस्त्यावर धावणार्‍याच नाही तर  उभ्या असलेल्या बसेसनासुद्धा आग लागली.  याबाबत चौकशी समिती नेमण्यात आल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसेसना आग लागण्यामागचे नेमके कारण काय याचा मात्र शोध अद्याप पीएमपीएमएल प्रशासनाला लागलेला नाही.

पुणे आणि पिंपरी शहरातील चाकरमाने तसेच विद्यार्थी यांची पीएमपीएल ही जीवनवाहिनी आहे. मात्र मागील कित्येक वर्षात या बसेसचे चाक अनेक अडथळ्यांमध्ये गुंतल्यामुळे त्यांचा  वेग मंदावलेला आहे. बसेस अचानक रस्त्यात बंद पडणे, ब्रेक फेल होणे त्याचबरोबर आगी लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या बहुतांशी बसेस या सीएनजी गॅसवर आहेत.डिझेलवर असलेल्या बसेसची संख्या पूर्वी जास्त होती. काळाच्या ओघात सीएजीवर चालणा-या बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या. मात्र ठराविक कालावधीनंतर या बसेस रस्त्यामध्ये चालू  तसेच बसस्थानकात उभ्या असताना अचानक पेट घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या बसेसबाबत  अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. तसेच अचानक बसने पेट घेतल्यामुळे  प्रवाशी सुध्दा घाबरून जात असल्याचे दिसून आले आहे .

 याबसेस अचानक  का पेट घेत आहेत याची चौकशी करण्यासाठी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी चौकशी  समिती नेमली आहे. या समितीमध्ये पीएमपी, एआरएआय संस्था, बस तयार करणारी कंपनी तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी बाबासाहेब  आजरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.  आतापर्यत दोन वेळा या समितीची बैठक झाली आहे . त्यानुसार बसला आगी का लागतात याबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे .मात्र अजुनही अंतिम अहवाल या समितीने सादर केलेला नाही .या समितीची तिसरी बैठक लवकर होणार आहे .त्या बैठकीमध्ये अहवाल सादर करण्याची चिन्हे आहेत.  या समितीचे अध्यक्ष प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब  आजरी यांनी पीएमपीच्या बसेसला आगी का लागतात याबाबत प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार इलेक़्ट्रीक वायरिंग अचानक  पेट घेत असल्याचे दिसून आले .त्याबरोबर बसेसची वेळेवर दुरूस्ती होत  नसल्यामुळे देखील आगी लागत असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. 

मात्र ठोस कारण अद्यापही समोर आले नाही. या समितीमध्ये अजुनही इतर अधिकारी आहेत त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यांतरच अंतिम कारण समोर येईल. असे त्यांनी स्पष्ट केले. तर पीएमपीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएमपीच्या बसेस रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोठेही पार्क करण्यात येतात परिणामी अनेकदा बसमधील साहित्याची चोरी होत असते.ही बाब अनेकदा चालकांच्या लक्षात येत नाही. बस सुरू  केल्यानंतर अचानक  आग  लागू शकते  असे  स्पष्ट केले.