Mon, Mar 25, 2019 02:49
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पीएमपी सेवा प्रवेश, पदोन्नती नियमावली तयार

पीएमपी सेवा प्रवेश, पदोन्नती नियमावली तयार

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:40PMपुणे : प्रतिनिधी 

‘पीएमपी’च्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची सेवा प्रवेश आणि पदोन्नती नियमावली तयार केली आहे. त्यानुसार 11 हजार 384 पदांचा आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. सरळभरतीने त्याचप्रमाणे खातेअंतर्गत भरावयाच्या पदसंख्या, पदोन्नतीसाठीच्या अटी व शर्तींचा नियमावलीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी  9 फेब्रुवारीला होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ही सेवा प्रवेश व पदोन्नती नियमावली मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

कंपनी स्थापन झाल्यापासून आजतागायत पीएमपीचा आकृतिबंधच तयार नसल्याने नव्याने कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून अधिकारी आणि कर्मचार्‍यांची गरज रोजंदारी पद्धतीने भागविली जात आहे. यामुळेच पुणे महापालिकेप्रमाणे पीएमपीनेही आकृतिबंध तयार करून सेवा प्रवेश व पदोन्नती नियमावली तयार करण्यात यावी, अशी वारंवार मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने ही नियमावली तयार केली आहे. या सेवा नियमावलीमध्ये कंपनी सेक्रेटरी, मुख्य तांत्रिक अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य लेखा अधिकारी, महाव्यवस्थापक, भांडार अधिकारी, लिपिक, कामगार अधिकारी, सुरक्षा अधिकारी व पर्यवेक्षक यांच्यासह कार्यकारी अभियंता, मेकॅनिक, हेल्पर, वाहतूक व्यवस्थापक, वाहक, चालक अशी विविध  विभागातील 59 प्रकारच्या तब्बल 11 हजार 384 पदांचा आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. यामध्ये 4800 वाहक, 3840 चालकांचाही समावेश आहे. 

यापैकी 2400 वाहक आणि 1920 चालक रोजंदारीवरील तर तितकेच खातेअंतर्गत प्रक्रियेने अर्थातच रोजंदारीतील वाहक आणि चालकांतूनच भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे; तसेच जनसंपर्क अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य अंतर्गत अर्थान्वीक्षक, लेखा अधिकारी, महाव्यवस्थापक, कार्मिक अधिकारी, चौकशी अधिकारी व कामगार अधिकारी ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.