Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Pune › ‘ऑनलाईन’ घरकामगार शोधत असाल तर सावधान!

‘ऑनलाईन’ घरकामगार शोधत असाल तर सावधान!

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:42AMपुणे : प्रतिनिधी

फोन किंवा आलेला एसएमएस; तसेच कोणत्याही सोशल साईडवरून घरकामासाठी नोकर शोधत असाल तर सावधान... कारण  अभियंत्या महिलेने ‘जस्ट डायल’वर घरकामासाठी महिलेची विचारपूस केली. त्यानंतर एका अनोळखी क्रमांकावरून कामासाठी महिला असल्याचे एसएमएस पाठवून 25 हजारांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, त्याने वाकड परिसरातून शहरासह देशातील जवळपास शंभर जणांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. 

विक्रम अतार सिंग (वय 31, रा. अक्षरा एलिमंटा, भूमकर चौक, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. गेल्या आठवड्यात चतुःशृंगी परिसरातील एका अभियंता महिलेने जस्ट डायलवर घरकामासाठी महिलेबाबत चौकशी केली. काही वेळातच, त्यांना आरोपींने  मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवला व घरकाम करण्यासाठी लेडीज व नर्स उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी एसएमएस आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्या वेळी त्याने साई समर्थ एंटरप्रायझेसमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर घरकाम करणार्‍या काही महिलांचे फोटो पाठवून त्यांची माहिती दिली. फिर्यादी यांनी आरोपीला एका महिलेबाबत नोकरीस पाठविण्यास सांगितले.

मात्र, त्या वेळी आरोपीने त्यांना कमिशन व एक महिन्याचा पगार अ‍ॅडव्हान्समध्ये देण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादींनी आरोपीने दिलेल्या खात्यावर एकूण 25 हजार रुपये भरले; परंतु त्यानंतर तो फोन उचलण्यास; तसेच नोकरीसाठी महिला देण्यास टाळाटाळ करू लागला. त्या वेळी फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर सेलकडे तक्रार दिली. त्यानुसार, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व उपनिरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्या वेळी आरोपी हा वाकडमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार, पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई आर्थिक व सायबर शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयराम पायगुडेे, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, रूपाली पवार, कर्मचारी डहाळे, पालवे, बिच्छेवार यांच्या पथकाने केली.  

कंपनी सुरू करून फसवणूक

आरोपी विक्रम सिंग याने दिल्ली येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो पुण्यात नोकरीसाठी आला. काही वर्षे त्याने नोकरी केली. त्यानंतर त्याने प्लेसमेंटची स्वत:ची कंपनी सुरू केली; मात्र त्यात त्याला यश आले नाही. आठ महिन्यांपूर्वी ही कंपनी बंद पडली. त्यानंतर त्याने जस्ट डायलवर घरकामासाठी महिला मिळतील याबाबत नोंद करून संपर्क क्रमांक दिला; तर क्विकर तसेच इतर माध्यमांद्वारेही जाहिरात करून फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने अशा प्रकारे पुण्यासह देशातील शंभर जणांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, असे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.  

..तर संपर्क करा

घरकामासाठी महिला मिळवून देण्याच्या बहाण्याने कोणाची अशा प्रकारे; तसेच समर्थ एंटरप्रायझेस किंवा कृष्णा सोनवणे या नावाने फसवणूक झाली असल्यास सायबर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, प्रत्यक्ष चौकशी करावी. प्रत्यक्षात कार्यालयात जाऊन खात्री केल्यासच पैसे भरावेत असेही सांगण्यात आले आहे.