Wed, Apr 24, 2019 19:46होमपेज › Pune › शहरातील 2 हजार 112  जणांचे परवाने निलंबित

शहरातील 2 हजार 112  जणांचे परवाने निलंबित

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:09AMपुणे ;नवनाथ शिंदे

 शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कंबर कसली आहे. वर्षभरात वाहतूक विभागाने बेशिस्त वाहनचालकांचा वाहन परवाना निलंबित करण्यासाठी तब्बल 3 हजार 811  परवाने आरटीओकडे पाठविले होते. त्यानुसार मोबाईलवर बोलणे, लेन क्रॉस करणे, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह करणार्‍या 2 हजार 112 जणांचे वाहन परवाने आरटीओने निलंबित केले आहेत.
राज्यातील सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनसंख्या वाढत आहे.

दरम्यान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे अनेकांकडून खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जाते. प्रामुख्याने दुचाकीवर प्रवास  करणार्‍यांची संख्या 15 ते 20 लाखांवर आहे. अरुंद रस्ते, पार्किंगची समस्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या वाढलेल्या  संख्यामुळे वाहतुकीचे नियम सर्रासपणे तोडले जात आहेत. विशेषतः मोबाईलवर बोलणे, लेन कटिंग करणे, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह वाहनचालकांवर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

वाहतूक विभागाच्या वतीने जानेवारी 2017 ते 2018 या वर्षभरात  3 हजार 811 वाहन परवाने आरटीओ कार्यालयाकडे कारवाई करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार संबंधित गुन्ह्यानुसार आरटीआनेे तब्बल 2 हजार 112 वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित केले आहेत.
वाहतूक विभागाच्या वतीने जानेवारी 2017 मध्ये आरटीओकडे 139 वाहन परवाने कारवाईसाठी पाठविले होते. त्यानुसार 38 वाहनचालकांचे परवाने निलंबित करून उर्वरित बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

फेब्रुवारीत 48, मार्चमध्ये 64, एप्रिलमध्ये 185, मे 697, जून 538, जुलै 159, ऑगस्ट 84, सप्टेंबर 62, ऑक्टोबर 55, नोव्हेंबर 71, डिसेंबर 86, तर जानेवारी 2018 मध्ये 251 बेशिस्त वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्याची कारवाई आरटीओने केली आहे. दरम्यान वाहन चालविताना मोबाईलवर बोलणार्‍या वाहनचालकांचा परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात येतो, तर लेन कटिंग करणार्‍या वाहनचालकांचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात येत आहे. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांचा परवाना सर्वाधिक 90 दिवसांसाठी निलंबित करण्यात येतो.