Mon, Aug 19, 2019 01:11होमपेज › Pune › हॉटेलांऐवजी घरीच नववर्षाचे स्वागत

हॉटेलांऐवजी घरीच नववर्षाचे स्वागत

Published On: Jan 01 2018 2:02AM | Last Updated: Jan 01 2018 12:20AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

सरत्या वर्षाला दणक्यात निरोप देत असताना काही विशेष ट्रेंड यंदा दिसून आले आहेत. त्यातही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणे किंवा पबला पार्टी करण्यापेक्षा अनेकांनी घरीच थांबणे पसंद केले आहे. त्यामुळे गाण्यांनी केवळ  पब नाही, तर घरही दणाणली होती. यातही घरी जेवण बनवण्यापेक्षा बाहेरून जेवण मागवण्याला अनेकांनी पसंती दिली.  घरी थांबून नव्या वर्षाचे स्वागत करण्याची पद्धत नवी नसली, तरी या वर्षी त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. घराबाहेर मद्यपान करून गाडी चालवत घरी येणे जीवासाठी धोकेदायक असल्याचे अनेकांनी मान्य केले आहे. त्यातच पोलिसांनी यंदा अत्यंत सतर्कपणे प्रत्येक चौकात दारू पिऊन गाडी चालवणार्‍यांना रोखण्यासाठी विशेष सतर्कता दाखवली आहे.तसेच, या मोहिमेची मोठी जनजागृतीही करण्यात आली होती.

यामुळेही अनेकांनी कोणतीही रिस्क न घेता घरीच सेलिब्रेशन केले. त्यासाठी दिवसभर बुधवार पेठ येथील इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत रंगीबेरंगी दिवे आणि साउंड सिस्टिम घेण्यासाठी झुंबड उडाली होती. जेवणामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवण बाहेरून ऑर्डर केले जात होते. यात काही पिझ्झा घरपोच देणार्‍या कंपन्या, तसेच काही हॉटेलातर्फे पार्सल मागवले, तर अधिक पदार्थ देण्यात येत असल्याने अशा योजनांना अधिक प्रतिसाद मिळत होता. जेवणासोबत विड्याचे पान मोफत, अशा काही योजनाही अनेकांनी लढवल्या होत्या. यातही काही इव्हेन्ट मॅनेज करणार्‍या कंपन्या घरी हवी  तशी पार्टी आयोजित करून देत असल्याने गर्दीत जाण्यापेक्षा मोजक्या व्यक्तींसोबत नव्या वर्षाचे स्वागत करायला अनेकांनी प्राधान्य दिले.