Thu, Apr 25, 2019 04:02होमपेज › Pune › आता काढता येणार रंगीत एक्स-रे

आता काढता येणार रंगीत एक्स-रे

Published On: Jul 15 2018 5:23PM | Last Updated: Jul 15 2018 5:23PMपुणे : प्रतिनिधी 

माणवी शरीराच्या कुठल्याही भागातील हाडांची इजा, झीज यांचे अचूक निदान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण निदान करण्याच्या एक्स रे (क्ष किरण) तंत्रात आता अमुलाग्र बदल होत आहे. आता प्रथमच ‘थ्री डी कलर एक्स रे’ या तंत्राचा शोध लावण्यात न्यूझिलंडमधील शास्त्रज्ञांना यश आले आहे. या कलर एक्स रे मुळे शरीरातील हाडांची प्रतिमा कलर स्वरूपात आणि स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे. यामुळे वैद्यकिय विश्‍वात निदान तंत्र अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे.

वैद्यकीय विश्‍वासत सध्या हाडांचे निदान करण्यासाठी केवळ काळा आणि पांढरा (ब्लॅक अँड व्हाईट) एक्स रे चा वापर करण्यात येत आहे. पण, न्यूझिलंडमधील शास्त्रज्ञांनी त्यापुढे जाउन नवीन तंत्र विकसित करत शरीराचा कलर एक्स रे काढू शकणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. येथील कॅन्टेरबरी विद्यापीठातील फिल बटलर या विकसकाने हे तंत्र विकसित केले असून त्यामध्ये युरोपच्या ‘सर्न फिजिक्स लॅब’ चा देखील मोलाचा वाटा आहे. 

वैद्यकीय विश्‍वात हाडांची प्रतिमा (फोटो) घेण्यासाठी एक्स रे तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्सारामुळे शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते. पण आता कलर एक्स रे मुळे डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरातील स्पष्ट आणि रंगीत प्रतिमा दिसु शकणार आहे. त्यामुळे संबंधित आजाराचे डॉक्टरांना अचूक निदान होण्यास मदत होईल असे स्पष्टीकरण ‘सर्न लॅब’ ने दिले आहे. तसेच या कलर एक्स रे मध्ये हाडे, स्नायु आणि हाडांमधील गादी (कार्टीलेज), कर्करोगाच्या सेल्स यांची स्पष्ट प्रतिमा पाहता येणार आहे. हे तंत्र आता न्युझिलंडमधील ‘मार्स बायोइमेजिंग’ ही कंपनी हे तंत्रज्ञान बाजारात आणण्याची शक्यता आहे.