Fri, Jul 19, 2019 20:13होमपेज › Pune › पालिकेच्या दांडी बहाद्दर कर्मचार्‍यांवर आता लगाम

पालिकेच्या दांडी बहाद्दर कर्मचार्‍यांवर आता लगाम

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:55AMपुणे : प्रतिनिधी

कामावर दांड्या मारून हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करणार्‍या कामचुकार महापालिका कर्मचार्‍यांना आता ‘आधारबेस बायोमेट्रिक’ यंत्रणेमुळे लगाम बसणार आहे. महापालिकेच्या कार्यालयांना आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली असून, ही यंत्रणा आता कर्मचार्‍यांच्या बॅकेच्या वेतन खात्याशी जोडली जाणार आहे. त्यामुळे कामावर आले तरच वेतन निघणार असल्याने दांडी बहाद्दर कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

महापालिकेत जवळपास 18 हजार कर्मचारी काम करतात. यामध्ये महापालिकेची क्षेत्रिय कार्यालये, रुग्णालये, अन्य वेगवेगळ्या कार्यालयात हे कर्मचारी कार्यरत आहेत. यासर्व कर्मचार्‍यांच्या हजेरीची नोंद घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने बायामोट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. पहिल्या टप्यात ती महापालिका भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये लावण्यात आली, त्यानंतर आता क्षेत्रिय कार्यालयांसह अन्य कार्यालयांमध्येही यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, कार्यालयांकडून बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा बसविण्यास टाळाटाळ केली जात आहे.

त्यामुळे प्रशासनाने आता थेट बायोमेट्रिक हजेरी थेट आधार कार्डशी लिंकअप करून कर्मचार्‍यांच्या बँक खात्याशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आधारबेस बायोमेट्रिक’ यंत्रणेत कर्मचारी, अधिकारी यांचा आधार क्रमांक हजेरीशी जोडला जाईल.  यात अनेक सुविधा उपलब्ध असल्याने कर्मचार्‍यांनी त्यांच्या बोटाचे ठसे दिल्यानंतर आधार क्रमांकाबरोबर त्याची पडताळणी होईल.त्यामुळे दांडी बहाद्दरांची  माहिती एका एसएमएसद्वारे प्रशासनाला उपलब्ध होऊ शकेल. या ‘आधारबेस बायोमेट्रिक’मुळे वेळेवर कामावर हजर न राहणार्‍या आणि दांडी मारूनही हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करून, वेतन घेण्याचा वर्षानुवर्षे सुरू असलेल्या प्रकारांना थेट लगाम घालणे शक्य होणार आहे. या यंत्रणेमुळे कर्मचारी व अधिकार्‍यांना वेतनाबरोबर इतर सुविधा पुरविणे सहजरित्या शक्य होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली.