Mon, Jul 22, 2019 02:39होमपेज › Pune › माननियांच्या भीतीने शिक्षकांच्या बदल्यांना खो

माननियांच्या भीतीने शिक्षकांच्या बदल्यांना खो

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या बदल्या यंदाही न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामागे माननियांचा बदल्यांमध्ये होणारा हस्तक्षेप आणि दबाव हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. महापालिकांपासून स्वायत्त असलेली शिक्षण मंडळे शिक्षण हक्क कायद्यामुळे बरखास्त झाली. त्यानुसार पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळाचे अस्तित्व गतवर्षी जून महिन्यात संपुष्टात आले. आता शिक्षण मंडळाचा कारभार पालिका प्रशासनामार्फत सुरू झाला आहे. मात्र, अद्यापही मंडळ अस्तित्व असताना ज्या पध्दतीने कारभार सुरू होता, त्याच पध्दतीने कामकाज होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

मंडळ अस्तित्वात असताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या बदल्या हा नेहमीच वादग्रस्त विषय ठरत होता, आताही तशीच अवस्था आहे. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षातही शिक्षक, शिपाई, रखवालदार यांच्या बदल्या होणार नसल्याचे प्रशासनाकडून  सांगण्यात आले. शिक्षकांच्या आणि कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्यानंतर त्यात माननियांचा हस्तक्षेप होतो. मर्जीतील शिक्षक आणि कर्मचार्‍यांची बदली रद्द करण्यासाठी अथवा त्यांना सोयीचे ठिकाण मिळावे यासाठी खासदार, आमदार आणि नगरसेवक यांचा अधिकार्‍यांवर प्रचंड दबाव येतो. त्यामुळे त्यांच्या भीतीने या बदल्यांचा निर्णयच नको रे बाबा, असा पवित्रा अधिकार्‍यांनी घेतला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी शिक्षक आणि कर्मचारी पुढे कायम राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

दरम्यान, प्रशासनाने बदल्या करण्यासाठी जे कारण पुढे केले आहे, त्यातही वस्तुस्थिती आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन अतिरिक्त आयुक्‍त राजेंद्र जगताप यांनी शिक्षक आणि कर्मचार्‍यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या होत्या. त्यावरून चांगलाच गदारोळ झाला होता. शिक्षण संघटना आणि माननियांनी त्यास तीव्र विरोध केला होता. त्यामुळे प्रशासनाला फेर बदल्या कराव्या लागल्या होत्या.
 

 

 

tags ; pune,news, Municipal, school, teacher, Employee, transfers,


  •