होमपेज › Pune › पालिकेच्या प्रकल्पांना ‘बीडीपी’चा अडथळा

पालिकेच्या प्रकल्पांना ‘बीडीपी’चा अडथळा

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांमधील जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षित जमिनींना किती आणि कशा पध्दतीने मोबदला देणार, याचा निर्णय राज्य शासनाने अद्याप घेतलेला नाही. आता महापालिकेच्या प्रकल्पांसाठी बीडीपीची जागा घेण्याची वेळी आली आहे; मात्र त्यांच्या मोबदल्याचा निर्णय झाला नसल्याने या जागांचे भूसंपादन करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलविल्या बैठकित या प्रश्‍नावरही चर्चा होऊन तो मार्गी लावण्यासाठी पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेत समाविष्ट 23 गावांचच्या विकास आराखड्यात 978 हेक्टरवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले आहे; मात्र या आरक्षणावर निर्णय घेण्यास शासनाला तब्बल 9 वर्ष लागली. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या बीडीपी आरक्षणावर शिक्का मोर्तब केले. या आरक्षणाचा जमीन मालकांना कशा पध्दतीने मोबदला द्यायचा, याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे बीडीपीग्रस्त जागा मालकही वैतागले असून, त्यावर आता मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टीबरोबर मेट्रोचा डेपो करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या जागेला लागून असलेल्या बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा पर्याय चाचपला जात आहे. बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्यास सर्वपक्षीय मंजुरी मिळाल्यास, हा तिढा सुटू शकतो. मात्र, त्यासाठी राज्य शासनाला आधी बीडीपी आरक्षणाच्या मोबदल्याचा प्रश्‍न मार्गी लावाला लागणार आहे. तरच या जमिनी ताब्यात घेऊन त्यावर शिवसृष्टी उभारणे शक्य होणार आहे.

अशाच पध्दतीने चांदणी चौकातील दुमजली उड्डाणपूलाच्या जकशनसाठी बीडीपीची दोन ते अडीच एकर जागेची आवश्यता आहे. बीडीपीच्या मोबदल्याचा प्रश्‍न सुटला नसल्याने या जागेच्या भूसंपादनात अडचण येत आहे. त्यामुळे त्यावर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली. एकंदरीतच गेल्या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या बीडीपीच्या मोबदल्याचा प्रश्‍न आता महापालिकेच्या विकासकामांमध्येच अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे त्यावर निर्णय घेण्याची वेळ आली.

आज मंगळवारी मुंबईत शिवसृष्टीसंबधीचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलविली आहे. याबैठकित या बीडीपी आरक्षणाच्या मोबदल्याबाबत सकारात्मक चर्चा होऊन त्याबाबत उपाय योजना उचलल्या जाण्याची शक्यता पालिकेतील सत्ताधारी पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आली.