Sat, Mar 23, 2019 16:40होमपेज › Pune › पार्कींग धोरणावरून पुन्हा रणकंदन

पार्कींग धोरणावरून पुन्हा रणकंदन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर घाई घाईने स्थायी समितीमध्ये शहराचे पार्किंग धोरण मंजूर केल्यानंतर, मागील पंधरा दिवसांपासून संपूर्ण शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. याबाबतचे वादळ शांत होत असतानाच, याच विषयावरून विविध पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्याने पुन्हा एकदा  रणकंदन माजले. 

पुणे महानगर परिषद या संस्थेच्या वतीने शनिवारवाड्याच्या प्रांगणात शुक्रवारी ‘मनपा पार्किंग धोरण’ या विषयावर महाचर्चेचे आयोजन केले होते. या चर्चेत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पालिका सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी महापौर प्रशांत जगताप, अंकुश काकडे, मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे, माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, पार्किंगचा आराखडा तयार करणार्‍या प्रंजली देशपांडे - आगाशे यांनी सहभाग घेतला. यावेळी बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड यांच्या हस्ते संस्थेच्या लोगोचे आनावरण करण्यात आले. प्रास्ताविक अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी केले.

यावेळी बोलतानाउपमहापौर डॉ. धेंडे म्हणाले, रात्रीच्या पार्किंग धोरणाला आमचा विरोध होता. उपसूचनेद्वारे आम्ही रात्रीचे शुल्क रद्द केले आहे. विरोधकांना या विषयाचे राजकारण करायचे असल्याने ते या धोरणास चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. अरविंद शिंदे यांना रिपाइं पक्ष फक्त झोपडपट्टीपुरताचमर्यादीत दिसतो, हा त्यांच्या दृष्टीचा दोष आहे. भेळ असेल तिकडे अरविंद शिंदे असतात, की नाही हे संपूर्ण सभागृहाला आणि पुणेकरांना माहित आहे.

भिमाले म्हणाले, आम्ही उपसूचनेद्वारे शहरातील प्रमूख पाच रस्त्यांवर प्रयोगिक तत्त्वावर पार्किंग धोरण राबविले जाणार आहे. रात्रीच्यावेळी शुल्क घेतले जाणार नाही. पुणेकरांवर अन्याय होईल असे काम केले जाणार नाही. तज्ञांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. वर्षभरात आठशे बसेस आणणार असून, लवकरच पाचशे बसेस रस्त्यावर येणार आहेत.

प्रशांत जगताप म्हणाले, पीएमपीच्या ज्या दोनशे बसेस आज रस्त्यावर आल्या आहेत, त्या आम्ही दिल्या आहेत. त्याचे पैसे आम्ही पूर्वीच पीएमपीला दिले आहेत. आम्ही विरोधक जरी असलो, तरी चांगल्या कामाला सहकार्य करू. पायाभुत सुविधा दिल्याशिवाय पार्किंग धोरण राबविण्यास आमचा विरोध आहे. अंकुश काकडे म्हणाले, पार्किंग समस्या फक्त पुण्यातच आहे, असे नाही. ती देशात आणि जगातही आहे. पार्किंग धोरणामुळे वाहनांचा वापर होईल, असे वाटत नाही. पार्किंग शुल्क घेण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र गल्ल्या आणि उपरस्त्यांवर नको. अरविंद शिंदे,  संजय भोसले, रुपाली पाटील , अजय शिंदे , संतोष शिंदे, प्रांजली देशपांड यांनीही आपली भूमिका मांडली.
 

 

 

tags ; pune,news,Municipal, parking, policy, discussion, held,


  •