Wed, Jul 24, 2019 14:10होमपेज › Pune › कोट्यावधींची जागा मालकांना देण्यासाठी माननीयांचा आटापिटा

कोट्यावधींची जागा मालकांना देण्यासाठी माननीयांचा आटापिटा

Published On: Jan 24 2018 1:47AM | Last Updated: Jan 24 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेने ताब्यात घेतलेली कोट्यावधी रुपयांची  जागा मूळ मालकाला परत देण्यासाठी माननीयांचा आटापिटा सुरूच असल्याचे मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. स्थायी समितीत यासंबधीचा फेरविचाराचा प्रस्ताव आयत्यावेळी मागे घेण्यात आला. मात्र काँग्रेसच्या सदस्यांने त्यावर आक्षेप घेतल्याने अखेर फेरविचार दाखल करून त्यावर प्रशासनाचा अभिप्राय घेण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.  पुणे पेठ पर्वती सर्व्हे नंबर 120अ, 120 ब येथील 27 एकर 13 गुंठे ही जागा नगररचना (टीपी स्किम) योजनेनुसार विटभट्टीसाठी 1963 साली पालिकेच्या ताब्यात आली आहे.  मात्र, ही जागा पुन्हा परत मिळविण्यासाठी मूळ जागा मालकाने न्यायालयात धाव घेतली असून त्यावर सद्या न्यायालयात सुनावणी  सुरू आहे.

न्यायालयीन प्रकिया सुरू असतानाच पालिकेची ताब्यात असलेली ही कोट्यावधीचा जागा मूळ मालकाला परत करण्याचा ठराव स्थायी समितीने गत आठवड्यात मंजुर केला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद दिलीप बराटे, प्रिया गदादे यांच्यासह पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपूरे यांनी हा प्रस्ताव मांडला होता. हा प्रकार चहाट्यावर आल्यानंतर शिवसेनेचे नाना भानगिरे  व काँग्रेसचे अविनाश बागवे या सदस्यांनी फेरविचाराचा ठराव दिला होत्या, त्यावर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकित निर्णय होणे अपेक्षित असतानात बैठकित आयत्यावेळेस हा फेरविचाराचा प्रस्ताव शिवसेनेच्या सदस्याने मागे घेतला, त्यासाठी स्थायी समितीचे सर्व सदस्य एकवटले. मात्र  बागवे यांनी त्यास विरोध दर्शविला. त्यांनी पुन्हा फेरविचार देत प्रशासनाचा अभिप्राय घ्यावा, असा प्रस्ताव दाखल केला. त्यावेळी समितीतील काही सभासदांनी याला विरोध केल्याने अखेर मतदान घेऊन हा विषय फेटाळावा, अशी मागणी बागवे यांनी केली.  नाइलाज म्हणून त्यावर प्रशासनाने अभिप्राय द्यावा, असा प्रस्ताव स्थायी समितीला मान्य करावा लागला. आता त्यावर प्रशासनाचा अभिप्राय हा स्थायी समितीचे ढोंग ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.