Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Pune › पाईपलाईन फुटल्याने महामेट्रोला भुर्दंड

पाईपलाईन फुटल्याने महामेट्रोला भुर्दंड

Published On: Mar 25 2018 1:52AM | Last Updated: Mar 25 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी 

‘महामेट्रो’कडून वनाज ते रामवाडी या मार्गाचे काम सुरू असताना; आयडियल कॉलनीजवळ जेसीबीचा धक्का लागून महापालिकेची जलवाहिनी शुक्रवारी फुटली होती. शनिवारी रात्री उशीरापर्यंत ही जलवाहिनी दुरूस्त करण्याचे काम सुरू होते. मात्र, ‘महामेट्रो’ला या मार्गावरील जमिनीखाली असलेल्या जलवाहिन्यांचे नकाशे दिलेले असतानाही, चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे ही जलवाहिनी फुटली असल्याचे समजते आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरूस्तीचा तसेच वाया गेलेल्या पाण्याचा खर्च महानगरपालिका ‘महामेट्रो’कडून वसूल करणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. 

पाईपलाईन फुटल्याने विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याचे नियोजन रविवारी सकाळी नियमितपणे सुरळीत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे की, वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेवर महापालिकेच्या प्रमुख जलवाहिन्या आहेत. त्यामुळे त्यांचे ठिकाण तसेच नकाशे या पूर्वीच महामेट्रोला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता महामेट्रोकडून काम करताना जमिनीखाली असलेल्या जलवाहिन्या तसेच सांडपाणी वाहिन्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

मात्र, कालच्या घटनेमुळे ती घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेला करावा लागणारा खर्च, नागरिकांना होणारा मन:स्ताप यासगळ्या गोष्टी त्याच्या दुरूस्तीचा खर्च महापालिकेस उचलावा लागत असून नागरिकांनाही मनस्ताप व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महामेट्रोकडून जलावहिन्यांच्या दुरुस्तीचा खर्च वसूल करण्यात येणार आहेत.