Sat, Jul 20, 2019 15:04होमपेज › Pune › घरांसाठी पालिकेसमोर आंदोलन

घरांसाठी पालिकेसमोर आंदोलन

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:58AMपुणे : प्रतिनिधी

महापालिका हद्दीतील हिंगणे खुर्द, कोंढवा बुद्रुक, महात्मा फुले पेठ, कोरेगांव पार्क येथील रेल्वे रुळालगत असलेल्या श्री संत गाडगे महाराज वस्ती आणि राजीव गांधी नगर, वडगांव बुद्रुक येथील झोपडपट्टीधारकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून त्यांना बेघर केले आहे. बेघर झालेल्या नागरिकांना एसआरए किंवा बीएसयुपी योजनेअंतर्गत त्वरीत घरे द्यावीत, या मागणीसाठी झोपडपट्टी वासियांनी पालिकेसमोर स्वयंपाक करून आंदोलन केले. पालिकेने बेघर झालेल्यांना हक्काची घरे न दिल्यास आयुक्तांना साडी-चोळी आणि बांगड्या भेट देण्याचा ईशारा यावेळी आंदोलकांनी दिला. 

झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलक महिलांनी पालिकेसमोरील रस्त्यावर जागोजागी चुली मांडून त्यावर भाकरी, भाजी तयार करत स्वयंपाक करून अभिनव पद्धतीने आंदोलन केले. त्यामुळे पालिकेसमोरून स.गो. बर्वे चौकाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता.  ग्रामपंचायत असल्यापासून हिंगणे खुर्द येथे राहात असलेल्या झोपडपट्टीधारकांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून बेघर केले आहे.

पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांसमवेत झालेल्या संयुक्त बैठकीत या नागरिकांना एसआरए आणि बीएसयुपी योजनेंतर्गत घरकुलं देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्याप कांहीच हालचाली झाल्या नाहीत. तसेच कोंढवा बुद्रुक येथील स.नं. 47 मध्ये गेली दहा वर्षापासून वास्तव्यास असणार्‍या नागरिकांना अतिक्रमण विभागाने कोणतीही नोटीस न देता बेघर केले आहे. त्यांनाही बीएसयुपी योजनेंतर्गत घरे देण्याचे लेखी आश्‍वासन पालिका प्रशासनाने दिले होते, प्रत्येक्षात मात्र काहीच दिले नाही.

या मागण्यांसह स्टेशन परिसरातील पथारी व्यवसायिकांना पूर्वीच्या जागेवर व्यावसाय करण्याची परवानगी द्यावी, कोरेगांव पार्क येथील रेल्वे रुळालगत असलेल्या श्री संत गाडगे महाराज वस्ती आणि राजीव गांधी नगर, वडगांव बुद्रुक येथील झोपडपट्टीधारकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून त्यांना बेघर केलेल्यांना एसआरए किंवा बीएसयुपी योजनेअंतर्गत त्वरीत घरे द्यावीत, या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.