Thu, Jun 27, 2019 13:44होमपेज › Pune › दोन दिवसांच्या चर्चेअंती अंदाजपत्रकाला मंजुरी

दोन दिवसांच्या चर्चेअंती अंदाजपत्रकाला मंजुरी

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी

विरोधकांची टिका आणि सत्ताधार्‍यांकडून करण्यात आलेले कौतुक, यातच महापालिकेच्या पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंगळवारी रात्री उशिरा मंजुरी देण्यात आली. ‘स’ यादीच्या निधीची असमान तरतुद, चालू वर्षाच्या अंदाजपत्रकातील कागदावर राहिलेल्या योजना, घटलेले उत्पन्न आणि बालगंधर्व रंगमंदिराचा पुर्नविकास अशा विविध मुद्यांवर सत्ताधार्‍यांनी या अंदाजपत्रकावर ताशेरे ओढले, तर शिवसृष्टीसाठी भरीव निधी, रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न करून वास्तववादी अंदाजपत्रक सादर केले असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपने या अंदाजपत्रकाची पाठराखण केली.  स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेचे सन 2018-19 चे 5 हजार 870 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मुख्यसभेला सादर केले होते.

गेल्या दोन दिवसांपासून त्यावर मुख्यसभेत चर्चा सुरू होती, या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसेच्या नगरसेवकांनी टिका करीत अंदाजपत्रक कसे फसवे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला, तर सत्ताधारी भाजपने मात्र, अंदाजपत्रकातील विविध योजनांचे दाखले देत शहराच्या विकासासाठी चांगल्या पध्द्तीचे अंदाजपत्रक असल्याचे प्रत्युतर दिले. त्यात शेरोशायरीने एकमेकांना उत्तरे देण्यात आली. 
यावेळी बोलताना  मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी या अंदाजपत्रकात शहराच्या विकासासाठी केवळ 1 हजार 465 कोटी रूपयाचा निधी उपलब्ध होतोय, मग 5 हजार 870 कोटी अंदाजपत्रकाला वास्तववादी कसे म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शहरातील आमदार-खासदार महापालिकेच्या निधीवर दरोडा टाकण्याचे काम करीत असल्याची टिका त्यांनी केली. शिवसेने गटनेते संजय भोसले म्हणाले, निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले, त्यासाठीच नदीसुधार, समान पाणी पुरवठा योजना, सायकल योजनांना बजेटमध्ये तरतुद केल्याचा आरोप केला.

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी या अंदाजपत्रकात कशा पध्दतीने चुकीच्या तरतुदी केल्या आहेत, याचा पाढाच वाचला. ते म्हणाले,  राज्यसरकारकडून जीएसटी अनुदान देताना दुजाभाव केला जात असून, स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचे स्पष्ट केले. अमृत योजने अंतर्गत एकही रूपया आलेला नाही. त्यातच उत्पन्न वाढीसाठी कोणत्याही उपाय योजना नाहीत, असे सांगत हे अंदाजपत्रक चुकीचे असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी या अंदाजपत्रकात नविन काहीच नाही असे सांगत सत्तर टक्के जुनेच बजेट सादर केलल्याचा आरोप केला. या बजेटमध्ये काहीच नसल्याने पारदर्शक व वास्तव बजेट म्हणावे लागेल, असा उपरोधिक टोला लगावला. सिमेंटचे रस्ते करण्यास आयुक्तांनी बंदी घातली.

यामुळे यावर्षीचे बजेट सुरूवाती पासून वर्गीकरणाचे बजेट ठरणार आहे अशी टिका त्यांनी केली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक खर्‍या अर्थाने वास्तववादी असल्याचे सांगितले. एमआयएमच्या गटनेत्या आश्‍विनी लांडगे यांनी अंदाजपत्रकात एमआयएमचे असद्दुदिन ओवेसी यांचे छायाचित्र जाणून-बजुन टाकले नसल्याचा आरोप केला. यावेळी आमोल बालवडकर, जयंत भावे, मनिषा लडकत, नंदा लोणकर, पल्लवी जावळे, सुजाता शेट्टी, मनिषा कदम, दत्तात्रय धनकवडे, स्मिता वस्ते, प्रशांत जगताप, बाळा ओसवाल, संगिता ढोसर, गोपाळ चित्तल यांनी अंदाजपत्रकावर भाषण केले. दरम्यान, रात्री साडेदहा वाजता चाळीस ते पन्नास नगरसेवकांच्या उपस्थितीत चर्चेअंती या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.