Tue, Mar 26, 2019 21:54होमपेज › Pune › कचरा डेपोच्या जागी मेट्रोचा डेपो

कचरा डेपोच्या जागी मेट्रोचा डेपो

Published On: Feb 07 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 12:09AMपुणे : प्रतिनिधी

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेऐवजी चांदणी चौकालगत असलेल्या जैववैविद्य उद्यानाच्या आरक्षित (बीडीपी) जागेत शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित घेण्यात आला. त्यामुळे कचरा डेपोच्या जागेत आता मेट्रोचा डेपो उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मेट्रोचे काम बंद पाडण्याचे आंदोलन नगरसेवक दिपक मानकर यांनी स्थगित केले आहे.  कोथरूड येथील सर्व्हे न.92 व 93 या कचरा डेपोच्या आरक्षित जागेवर शिवसृष्टी उभारण्यास मुख्यसभेने मंजुरी दिली आहे. तर याठिकाणी वनाज ते रामवाडी या मार्गाचा मेट्रो डेपोही प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यातच शिवसृष्टीबाबत राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा दिल्या होत्या.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यासंबधीचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली होती. त्यात  कोथरूड येथील कचरा डेपो च्या जागेवर मेट्रोचे डेपो करून लगतच्या स.न.99 व 100 मधील बीडीपीच्या 50 एकर जागेत शिवसृष्टी उभारुयात असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले. तसेच खासबाबत म्हणून बीडीपीचा निर्णय तात्काळ घेण्याबरोबरच त्यासाठी  आरक्षण बदल व जागा ताब्यात घेण्यासाठी येणारा खर्च याचा विस्तृत आराखडा तयार करावा असा आदेश देतानाच शिवसृष्टीसाठी निधी देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच शिवसृष्टी च्या मुद्द्यावरून नगरसेवक मानकर यांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावावर  सर्व पक्षीय उपस्थितांनी त्यास सहमती दर्शविली.  मानकर त्यावर आंदोलन स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचा डेपो तर बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी साकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान प्रस्तावित शिवसृष्टीपर्यंत मेट्रोचा मार्ग नेण्यात येऊन नव्याने जे स्थानक होणार आहे, त्यास शिवसृष्टी हे नाव देण्याचा मानकर यांच्या मागणीलाही यावेळी मंजुरी देण्यात आली. याबैठकिला पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले, मनसेचे वसंत मोरे यावेळी उपस्थित होते.


शिवसृष्टी उभारण्याबाबत आग्रही भूमिका होती. चांदणी चौकातील बीडीपी’च्या पन्नास एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे; तसेच या प्रकल्पासाठी निधी देण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. त्यामुळे आता मेट्रो आणि शिवसृष्टी हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. 

- गिरीश बापट, पालकमंत्री 

शिवसृष्टी उभारण्याबाबत आधीपासूनच सकारात्मक भूमिका होती.  पुणेकरांची शिवसृष्टी लवकरच साकारली जाईल. मुख्यमंत्र्यांचे पुणेकरांच्या वतीने आभार.  

- मुक्ता टिळक, महापौर 


भाजपचा आनंदोत्सव

शिवसृष्टी उभारण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने महापालिका भवनात फटका वाजवून  आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा  केला. यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.


शिवसृष्टी बीडीपी’त उभारण्याचा निर्णय मान्य आहे. या कामात राजकारण आणणार नाही. मात्र, लबाडाच्या घराचे आवतन जेवल्या शिवाय खर नाही. या म्हणीनुसार  या प्रकल्पाच्या कामात आता कोणताही अडथळे येऊ नये.  पुढील प्रक्रिया लवकर व्हावी, हीच अपेक्षा आहे. 

- चेतन तुपे, विरोधी पक्षनेता, 

बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्यास सहमती दर्शवून आम्ही पुकारलेले आंदोलन स्थगित करीत आहोत. मात्र कचरा डेपोच्या जागेवरील मेट्रोचा डेपो आणि बीडीपी जागेत शिवसृष्टी या दोन्हींचे भुमिपूजन एकाचवेळी करण्यात यावी अशी आमची आग्रही मागणी आहे. 

- दिपक मानकर, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस.