Tue, Apr 23, 2019 18:25होमपेज › Pune › वैद्यकीय उपचारांत होतोय सर्वाधिक खर्च औषधांचा

वैद्यकीय उपचारांत होतोय सर्वाधिक खर्च औषधांचा

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:10AMपुणे  : प्रतिनिधी

रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल  केला असता त्याला येणार्‍या एकूण खर्चापैकी सर्वाधिक 30 टक्के खर्च औषधांवर होत आहे. त्याखालोखाल वैद्यकीय चाचण्या, डॉक्टरांची फी, रूम भाडे आणि किरकोळ वापरण्यात येणार्‍या वस्तूंवर होत आहे. ‘राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण’(एनपीपीए)ने देशातील चार खासगी रुग्णालयांतील चार रुग्णांच्या बिलांचा अभ्यास केला असता ही वस्तुस्थिती समोर आली आहे. यातील अनेक औषधांना नियंत्रित केल्यास त्याचा रुग्णांना फायदा होऊ शकतो.

औषधांवर सर्वाधिक खर्च होण्याचे कारण म्हणजे, शासनाने हजारो औषधांपैकी  केवळ 871 औषधांच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. उरलेल्या औषधांच्या किमती या औषधनिर्मिती करणार्‍या कंपन्या उत्पन्न खर्चापेक्षा पाच ते पंधरा पटीने जास्त लावतात. रुग्णांना दुसरा उपाय नसल्याने त्यांची खरेदी करणे भाग पडते. यामध्ये औषधनिर्मिती कंपन्या, हॉस्पिटल्स आणि डॉक्टर हे तीन घटक आलेला नफा वाटून घेतात. तो सर्व पैसा मात्र सर्वसामान्य रुग्णांकडून वसूल केला जात असल्याचे मत ‘एनपीपीए’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्‍त केले आहे.

एनपीपीएने तपासणी केलेल्या चार रुग्णालयांची नावे जाहीर केलेली नाही. पण, त्यांनी चार रुग्णांना 69 लाख 34 हजार रुपयांचे बिल आकारले होते. या चार रुग्णांचा सर्वाधिक 30 टक्के खर्च (17 लाख) हा औषधांवर झालेला आढळला आहे. त्यापैकी 4. 10 टक्केच खर्च (2.80 लाख) नियंत्रित औैषधांवर तर, 25.67 टक्के खर्च (17. 79 लाख) शासकीय नियंत्रण नसलेल्या औषधांवर झाला आहे.  शासनाने 2013 मध्ये ‘औषध किंमत नियंत्रण आदेश’ काढत रुग्णांना अत्यावश्यक असणार्‍या औषधांच्या किमती औषधांच्या उत्पन्न खर्चानुसार नियंत्रित (कमी) केल्या. सध्या याअंतर्गत 871 औषधांच्या किमती नियंत्रित केल्या आहेत; मात्र या औषधांचा वापर मात्र रुग्णालयांकडून खूप कमी प्रमाणात केला जात आहे. उलट जास्त ‘मार्जिन’ असलेल्या औषधांचा वापर प्रचंड प्रमाणात केला  जात आहे.