Mon, Apr 22, 2019 05:43होमपेज › Pune › भाषा दिनाचा ‘मराठी अभिजात’चा मुहूर्त हुकला

भाषा दिनाचा ‘मराठी अभिजात’चा मुहूर्त हुकला

Published On: Feb 27 2018 1:58AM | Last Updated: Feb 27 2018 12:39AMपुणे :प्रसाद जगताप

गेल्या काही वर्षांपासून मराठीला अभिजात दर्जा प्राप्‍त व्हावा, यासाठी अनेक साहित्य संस्था प्रयत्नशील होत्या. या सरकारी कार्यालयातून त्या सरकारी कार्यालयात फाईलींवर फाईली फिरत होत्या. काही साहित्य संस्था तर थेट दिल्लीला जाऊन धडकल्या, आंदोलने झाली. साहित्यिकांच्या बैठकी झाल्या. राजकीय नेत्यांसोबतच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांशीदेखील चर्चा झाल्या, त्यांच्याकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मराठी भाषेला मराठी भाषादिनी अभिजात दर्जा मिळेल, अशी साहित्यिकांना आस लागली होती. मात्र, हा मुहूर्तही अखेर हुकला आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या समितीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीच्या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर, सरकार दरबारी हालचाली होण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून लोकचळवळ सुरू करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली 40 लेखकांची बैठक, पंतप्रधान कार्यालयाशी केलेला पत्रव्यवहार, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने शाहूपुरी शाखेमार्फत पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेली एक लाखाहून अधिक पत्रे, यामुळे पंतप्रधान कार्यालयाला या विषयाची दखल घेणे भाग पडले. सांस्कृतिक मंत्रालयाचे अवर सचिव कवरजीत सिंग यांनी पत्र पाठवून मद्रास उच्च न्यायालयाकडून या प्रश्नाबाबत असलेली याचिका न्यायालयाने निकाली काढल्यामुळे सांस्कृतिक मंत्रालयाने  कृतिशील कार्यवाही सुरू केल्याचे कळविले, असे साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

पाचगणी येथे साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, या विषयावर सविस्तर चर्चा केली. तेव्हा त्यांनी व्यक्तीशः पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. जूनमध्ये पुन्हा पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता, मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल लक्षात घेऊन एक सुधारित कॅबिनेट नोट तयार करण्याचे काम सुरू असल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर सहा महिने झाले तरी कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण होऊनही अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही, अशी खंतही जोशी यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा दिनापूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजातचा दर्जा द्यावा, याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत 26 जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा साहित्य परिषदेने दिला. त्यानुसार मराठी सदन, दिल्ली येथे अनेक साहित्य संस्था, साहित्यिक, लेखक, प्रकाशक यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांशी संवाद साधण्यात आला. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अन्य नेत्यांच्या भेटी घेण्यात आल्या, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही, असेही ते म्हणाले.