होमपेज › Pune › सरकारी डावात मनिषा चितपटच!

सरकारी डावात मनिषा चितपटच!

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:35AMयवत : दीपक देशमुख

नुकत्याच वेल्हे तालुक्यत  झालेल्या व प्रथमच पार पडलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दौंड तालुक्यातील वरवंडमधील मनीषा दिवेकर हिने अजिंक्यपद पटकावले असले तरी शासनदरबारी मात्र तिला चितपटच व्हावे लागले आहे. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून कुस्तीचे मैदान मारणार्‍या मनीषा दिवेकरची साधी विचारपूसदेखील जिल्ह्याच्या क्रीडा विभागाकडून झाली नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

मनिषा हिच्या घरची परिस्थिती जेमतेम असून, वडील महादेव दिवेकर यांच्या जिद्दीमुळे आज ती कुस्ती करू शकते, असे ती आवर्जून सांगते. 24 वर्षीय मनिषा हिला प्रशिक्षकांचे मानधन परवडत नसल्याने आपला भाऊ राहुल यालाच तिने आता प्रशिक्षक मानले असून, वरवंड गावातील कुस्ती केंद्रात ती आता सराव करत आहे.अवघ्या 1 एकर शेतीवर तिचे कुटुंब अवलंबून असून, यात आपला उदरनिर्वाह करण्याचे आव्हान तिचे वडील महादेव दिवेकर यांच्यासमोर उभे आहे

महिन्याकाठी साधारणपणे तिला 50 हजार रुपयांचा खुराक लागत असून, मी माझ्या जिवाचे रान करील; पण तुला काही कमी पडू देणार नाही असा विश्वास महादेव दिवेकर यांनी व्यक्त केला आहे  गेल्या 7 ते 8 वर्षात मनिषाने राज्यपातळीवर 16 वेळा व राष्ट्रीय पातळीवर 17 वेळा सुवर्णपदक मिळवले आहे. एवढी कामगिरी करूनही तिची साधी विचारपूस आतापर्यत क्रीडा विभागाने केली नाही. मग जिल्ह्याचा क्रीडा विभाग नेमके काय काम करतो हाच प्रश्न वरवंडकरांना पडला आहे.

मर्दानी खेळ असणार्‍या कुस्तीची ओळख मनिषा दिवेकरसारख्या महिला खेळाडूंमुळे  बदलत असून, त्याला शासकीय यंत्रणेचे ग्रहण लागले आहे. मागील वर्षी तिने आशियाई स्पर्धेत भारताचे नेतृत्व करताना चमकदार कामगिरी केली होती. यात्रा काळात गावात भरणार्‍या कुस्तीच्या आखाड्यात मनिषाची कुस्ती आकर्षक होत असून, ती जिंकणारच असा विश्वास कुस्तीपूर्वीच कुस्ती शौकीन व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.

 राज्य शासन लाखो रुपये खेळावर खर्च करते; पण हा खर्च खरेच योग्य ठिकाणी जातो का तसेच मनिषासारख्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी क्रीडा अधिकार्‍यांना कोणत्या भाषेत सांगावे लागेल तेव्हा त्यांना समजेल हेच कळत नाही. सध्याची सर्व परिस्थिती लक्षात घेता केवळ आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा नसतानादेखील मनिषाला लवकरच कुस्ती खेळणे बंद करावे लागणार आहे, असे चित्र दिसत आहे.  ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाला कुस्तीत सुवर्णपदक मिळवण्याची मनीषा ठेवून कुस्ती करणारी मनीषा  मात्र आता आर्थिक अडचणीत सापडली आहे हे नक्की.