Mon, Mar 25, 2019 18:17होमपेज › Pune › महाराष्ट्र बंदमुळे शेतमाल मातीमोल

महाराष्ट्र बंदमुळे शेतमाल मातीमोल

Published On: Jan 04 2018 2:04AM | Last Updated: Jan 04 2018 1:16AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात पुकारलेल्या बंदमुळे गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शेतमालाची आवक 20 ते 30 टक्क्यांनी घटली. दरम्यान, आवकच्या तुलनेत मागणीही कमी असल्याने दरही मोठ्या प्रमाणात उतरले. नागरिक घराबाहेर न पडल्याने बाजारात खरेदीअभावी माल पडून राहिला. परिणामी, शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. 

याबाबत बोलताना श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, की बाजारात बुधवारी (ता. 3) फळभाज्यांची अवघी 70 ते 75 ट्रक आवक झाली. तर, 50 ट्रक कांदा आणि 35 ते 40 ट्रक बटाटा बाजारात दाखल झाला होता. शहरातील किरकोळ भाजीविक्रेते, तसेच नागरिक खरेदीसाठी बाहेर न पडल्याने तब्बल 30 ते 35 टक्के माल शिल्लक राहिला आहे. बंदमुळे किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीकडे पूर्ण पाठ फिरवली, तर नियमित पुरवठा करणार्‍यांकडून थोड्या फार प्रमाणात खरेदी झाली. दरम्यान, आवकच्या तुलनेत मागणी घटल्याने फळभाज्यांच्या दरात 10 ते 20, तर पालेभाज्यांच्या दरात 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली होती.

फळबाजारात नेहमीच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी फळांची आवक कमी झाली होती. विक्रीसाठी गिर्‍हाईक नसल्याने अवघी 10 टक्के मालाची विक्री झाली. परिणामी, बाजारात शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेली फळे तशीच पडून राहिली आहे. गुरुवारी (ता. 4) या सर्व फळांची विक्री होईल, अशी अपेक्षा फळांचे व्यापारी अरविंद मोरे व सुनिल बोरगे यांनी व्यक्त केली. वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी बाजारात माल विक्रीसाठी आणला नाही. येथील फुलबाजारात नेहमीच्या तुलनेत अवघा 70 टक्के माल बाजारात दाखल झाला. मात्र, फुलांच्या खरेदीसाठी बाजारात गिर्‍हाईक नसल्याने फुलांचे दर दहा ते तीस टक्क्यांनी घटले. 

शहरातील बाजारातून मुंबई, तसेच इतर गावांमधील बाजारात झेंडू, गुलछडी आदी फुलांचा पुरवठा करणार्‍या व्यापार्‍यांनीही बंदच्या धास्तीमुळे माल न भरल्याने बहुतांश माल पडून राहिल्याचे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर गूळ व भुसार बाजारातील व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवल्याचे निदर्शनास आले.