Wed, Jul 24, 2019 06:45होमपेज › Pune › पीएमपी’च्या रोजच्या उत्पन्नात 10 लाखांचा तोटा

पीएमपी’च्या रोजच्या उत्पन्नात 10 लाखांचा तोटा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

‘पीएमपी’साठी अत्यंत कडक शिस्तीचे लाभलेले अध्यक्ष  तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर  पीएमपीची स्थिती अत्यंत भयावह झालेली दिसून येत आहे. मुंढे यांनी  ब्रेकडाउनचे प्रमाण कमी केले होते. तर  प्रवासी संख्यासुद्धा वाढली होती. आता मात्र  एका महिन्यातच विविध  मार्गांवरील बसची संख्या घटली आहेच,  शिवाय  प्रवाशांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. परिणामी पीएमपीच्या उत्पन्नात रोज सुमारे दहा लाख रुपयांचा तोटा होऊ लागला आहे. तसेच रोजच्या प्रवाशांची संख्या सुमारे 80 हजाराने घटली आहे. दरम्यान  मनमानी करण्यास कर्मचार्‍यांना मोकळे रान मिळाले असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

तुकाराम मुंढे यांनी  अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंर पीएमपीस   शिस्त लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास सुरुवात केली. त्यामध्येे कर्मचार्‍यांनी वेळेवर कामाला येण्यासाठी कडक धोरण अवलंबिले. तसेच ब्रेकडाउन कमी करण्यासाठी  सेंट्रल वर्कशॉपच्या कामांच्या वेळामध्ये बदल केला. त्याचप्रमाणे  ब्रेक डाउन झालेल्या बसची जबाबदारी अधिकार्‍यांवर सोपविली होती. यामुळे काही प्रमाणात  ब्रेक डाउनच्या प्रमाणात घट झाली होती. नोव्हेंबर 2016 मध्ये पीएमपीच्या आणि कंत्राटदारांच्या बस अशा  मिळून सुमारे  एक हजार 322 बस मार्गावर धावल्या.  मुंढे यांनी  पदभार स्वीकारल्यानंतर  नोव्हेंबर 2017 मध्ये बसमध्ये वाढ झाली. ती  एक हजार 440 वर पोहोचली. पीएमपीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नोंदीनुसार  26 मार्चला  एक हजार 327 बस  मार्गावर सेवेत होत्या, ही बाब लक्षात घेतल्यास सध्या सुमारे शंभरने बसेसची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे. 

बसेसबरोबर प्रवासी संख्येतही कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर 2016 च्या तुलनेत सुमारे सव्वालाखापेक्षा अधिक प्रवासी वाढून नोव्हेंबर 2017 मध्ये प्रवासी संख्या 11 लाख 11 हजारांवर पोहोचली होती. सध्या सरासरी प्रवासी संख्या  10 लाख 50 हजारवर आली आहे.तर  जानेवारी महिन्यात रोजचे  सरासरी उत्पन्न एक कोटी 44 लाख 70 हजार एवढे होते. फेब्रुवारी महिन्यात ते   एक कोटी 47 लाख 48 हजार 325 रुपये एवढे झाले होते. म्हणजेच उत्पनात वाढ झाली असून, मार्च महिन्यात रोजचे सरासरी  उत्पन्न एक कोटी 34 लाख सात हजार रुपये एवढे झाले. सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या जानेवारीत 10 लाख 71 हजार 579, फेब्रुवारीत 10 लाख 71 हजार 878 आणि मार्च महिन्यात मात्र 9  लाख 92 हजार 435 एवढी खाली आली आहे.
 


 


  •