Tue, Apr 23, 2019 05:36होमपेज › Pune › कोथरूडमध्ये स्वयंघोषित  डॉन’चा दोन दिवस राडा

कोथरूडमध्ये स्वयंघोषित  डॉन’चा दोन दिवस राडा

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:51AM’पुणे : प्रतिनिधी

कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर भागात स्वयंघोषित ‘डॉन’ व त्याच्या साथीदारांनी ‘येथे फक्त माझीच दहशत आहे’ म्हणत जबरदस्त राडा केला. एका महिलेच्या घरात घुसून, तलवारीने तोडफोड करत एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्नही त्याने केला. तसेच या परिसरात नंग्या तलवारी दाखवत दहशत माजवली. विशेष म्हणजे, दोन दिवस हा राडा सुरू होता. मात्र, पोलिसांना याचा थांगपत्ताही लागला नाही. तक्रारदार आल्यानंतर पोलिसांनी नियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी संजय गणपत मरे (वय 28, रा. शिरगाव, मुळशी) याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात शारदा कसबे (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे. तर परशुराम मच्छिंद्र कांबळे (रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड) हे यात गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा कसबे या शुक्रवारी (दि. 2 मार्च) सकाळी सव्वानऊच्या सुमारास शास्त्रीनगर येथील त्यांच्या राहत्या घरी होत्या. त्यावेळी संजय मरे, रामा कुडले आणि त्याची मुले फिर्यादी यांच्या घरात घुसले.

त्यांच्या दारावर तलवारीने आणि कुर्‍हाडीने वार करत दहशत निर्माण केली. पार्किंगमधील दोन दुचाकींचेही नुकसान केले. त्यावेळी संजय मरे याने ‘या भागात मी एकटाच ‘डॉन’ आहे’ असे जोरजोरात ओरडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सकाळच्या वेळी अचानक हा प्रकार घडल्याने परिसरात दहशत पसरली. त्यानंतर रविवारी सात वाजता रामा कुडले आणि संजय मरे हे दोघे पुन्हा हातामध्ये कुर्‍हाड आणि तलवार घेऊन आले. कसबे यांच्या वस्तीमध्ये राहणारे परशुराम मच्छिंद्र कांबळे यांच्यावर कुर्‍हाडीच्या दांडक्याने आणि तलवारीने वार करून, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी परिसरातील नागरिकांना तलवारीचा धाक दाखविण्यात आला. मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.  दोन दिवस शास्त्रीनगरसारख्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रकार घडल्यानंतरही पोलिसांना याची खबर नव्हती. कांबळे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसरीकडे कोथरूड परिसरात गुन्हेगारांनी बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.