Wed, Jul 24, 2019 14:29होमपेज › Pune › बीडीपी’त साकारणार शिवसृष्टी

बीडीपी’त साकारणार शिवसृष्टी

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:46AMपुणे : प्रतिनिधी

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी साकारणार की, मेट्रोचा डेपो होणार याचा तिढा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचा डेपो उभारून चांदणी चौकालगतच्या ‘बीडीपी’ आरक्षित जमिनीवर शिवसृष्टी उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता मेट्रो चांदणी चौकापर्यंत धावणार आहे. हा निर्णय घेण्यासाठी फडणवीस यांनी मुंबईत सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यात मुख्यमंत्र्यांनी चांदणी चौकालगत असलेल्या ‘बीडीपी’च्या 50 एकर जागेत शिवसृष्टी करण्याचा पर्याय मांडला, त्यास एकमताने सर्वांनी सहमती दर्शविली. त्यामुळे कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचा डेपो उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा तिढा सोडविताना मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

वनाज ते रामवाडी  ही मेट्रो आता थेट चांदणी चौकापर्यंत म्हणजेच शिवसृष्टीच्या प्रवेशद्वारापर्यंत होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासही मंजुरी दिली. त्यामुळे वनाजपासून चांदणीचौकापर्यंत आणखी अडीच ते तीन किमीपर्यंत मेट्रोचा मार्ग वाढणार आहे.  या भागातील नागरिकांबरोबर पुणेकरांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर याच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ‘बीडीपी’ आरक्षणच्या मोबदल्याचा निर्णय येत्या पंधरा दिवसांत घेण्याचे आश्‍वासन दिले.