Mon, Jun 17, 2019 21:23होमपेज › Pune › कोरेगाव भीमा वादाचे पुण्यात पडसाद 

कोरेगाव भीमा वादाचे पुण्यात पडसाद 

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 12:34AM

बुकमार्क करा
पुणे ःप्रतिनिधी

कोरेगाव भीमा येथील वादाचे पडसाद पुणे शहरातही मंगळवारी उमटले. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मंगळवारी दिवसभर तणावपूर्ण परिस्थिती होती. काही ठिकाणी एसटी व पीएमपी बसेसची तोडफोड वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील उपनगरांमध्ये दहा बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  कोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटांत झालेल्या वादातून दगडफेक व वाहनांची तोडफोड, तसेच जाळपोळ करण्यात आली होती. मंगळवारी या घटनेचे पडसाद उमटण्यास सकाळपासून सुरुवात झाली.

विविध पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन निषेधाची निवेदने देण्यात आली, तर विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस आयुक्तांनाही निवेदन दिले. पोलिस आयुक्तांनी शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना शांततेचे आवाहन केले होते. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास  पुणे-सासवड रस्त्यावर भेकराईनगर येथे अज्ञात तरुणांकडून मंगळवारी एसटी व पीएमपी अशा दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. तातडीने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. दोन्ही वाहने भेकराईनगर येथील जकात नाक्यावर हलविण्यात आली. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाजवळ निषेध करण्यासाठी काही संघटनांचे कार्यकर्ते जमले होते. त्यावेळी तेथून जाणार्‍या दोन बसेसवरही दगडफेक करण्यात आली. तेथेही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला.   राज्य राखीव दलाच्या  तुकड्या तैनात  पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात तणाव वाढल्यावर पोलिसांकडून दुपारनंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली. राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्या, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी) आणि राखीव पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पोलिस कर्मचारी व अधिकार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितली. 

आयटी कंपन्यांत लवकर सुटी  शहरातील महत्त्वाच्या आयटी कंपन्यांमध्ये शहरातील तणावाची बातमी पोहोचताच कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना लवकर काम आटोपून घरी जाण्यास सांगितले. तसेच कॅब सर्व्हिस बंद करण्यात आली असून आपापली व्यवस्था करून घरी जाण्याबाबतचे ईमेलद्वारे व तोंडी सांगण्यात आले, अशी माहिती एका कर्मचार्‍याने दिली.