Sat, Aug 17, 2019 16:59होमपेज › Pune › जिग्नेश, उमरवर गुन्हा दाखल

जिग्नेश, उमरवर गुन्हा दाखल

Published On: Jan 05 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 12:51AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

शनिवारवाड्यावर रविवारी (दि. 31)  झालेल्या एल्गार परिषदेत दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये केल्यानेच त्यापासून प्रेरीत होऊन काही अज्ञातांनी कोरेगाव-भीमा  विजयस्तंभ परिसरात दगडफेक आणि जाळपोळ केली, असा आरोप करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अक्षय गौतमराव बिक्कड (22, कर्वे नगर, मूळ रा. लातूर ) या तरुणाने फिर्याद दिली आहे.  कोरेगाव-भीमा येथील विजयाला 200 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पुण्यातील शनिवारवाड्यावर 31 डिसेंबर रोजी काही संघटनांकडून एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांनी हजेरी लावली होती. या परिषदेत दोघांची भाषणे झाली. त्यामध्ये या दोघांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण केली. त्यामुळे काही अज्ञात व्यक्तींनी प्रेरित होऊन कोरेगाव-भीमा  येथील विजयस्तंभ परिसरात दगडफेक तसेच जाळपोळ केली, असे तक्रारीत म्हटले आहे. या कार्यक्रमानंतर दुसर्‍या दिवशी कोरेगाव-भीमा येथील प्रकार घडल्यानंतर अक्षय बिक्कड या तरुणाने 2 जानेवारी रोजी डेक्कन पोलिस ठाण्यात आपली तक्रार दिली होती. त्यानंतर शनिवार वाडा विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने ही तक्रार विश्रामबाग पोलिसांकडे पाठविली होती. त्यानंतर बुधवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.