Tue, Jul 16, 2019 00:02होमपेज › Pune › प्रेमाला मार्ग दाखवणारे ‘राईट टू लव्ह’

प्रेमाला मार्ग दाखवणारे ‘राईट टू लव्ह’

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 11 2018 11:38PMपुणे :ज्योती भालेराव-बनकर 

‘व्हॅलेंटाईन-डे’ जवळ आला की, त्याविषयीची मतमतांतरे, वाद, चर्चा सुरू होतात. सध्या आपल्या समाजात जातीय वा धर्मीय  असहिष्णुतेचे वातावरण आहे. प्रत्येकाच्या जात, धर्माच्या भावना या अधिकाधिक टोकदार होताना दिसून येतात. त्यातच भिन्न जात किंवा धर्म असताना प्रेम व लग्न करणे खरोखर आव्हानात्मक ठरते; मात्र पुण्यातील असे काही तरुण आहेत जे, जात धर्माच्या भिन्नतेमुळे अडचणीत येणार्‍या अनेक प्रेमीयुगलांना ‘राईट टू लव्ह’च्या माध्यमातून दिलासा देत आहेत. त्यांच्या या कामामुळे अनेकांचे आयुष्य स्थिरावण्यास मदत झाली आहे.

लातूर जिल्ह्यात डिसेंबर 2014 मध्ये एका प्रेमीयुगलाला मारहाण करण्यात आली होती. मात्र समाजातील कोणत्याही स्तरातून त्यावर निषेध नोंदवला गेला नाही. त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून पुण्यातील काही परिवर्तनवादी तरुण-तरुणींनी एकत्र येऊन दि. 22 जानेवारी 2015 मध्ये एक निषेध मोर्चा काढला होता. यातूनच पुढे जाऊन ‘राईट टू लव्ह’ या संस्थेची स्थापना झाली, असे या संस्थेचे अभिजित कांबळे यांनी सांगितले. ‘राईट टू लव्ह’ नावाच्या फेसबुक पेजवर आम्ही आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेम विवाह, समलैंगिक विवाह, हक्क, अधिकारांबद्दल जागृती करायचो. यातूनच पुढे जाऊन आमच्या या कामाला आकार येत गेला आणि त्यातून ‘लव्ह टू राईट’चे काम उभे राहिले.

सध्या या ग्रुपमध्ये पत्रकार, वकील, समुपदेशक, वेगवेगळ्या चळवळींमधील परिवर्तनवादी विचारांचे तरुण-तरुणी काम करतात. ‘राईट टू लव्ह’चे काम संपूर्ण महाराष्ट्रात होते. तर आगर्‍यासारख्या शहरातील केस देखील सोडवण्यात आली आहे. संस्थेच्या तीन वर्षांत 15 आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमविवाह त्यांच्याकडून लावून दिले आहेत. याशिवाय संस्था बालविवाह रोखणे, तरुण-तरुणी समुपदेशन अशी अनेक कामे करते. सध्याचे देशातील ‘अ‍ॅानर किलिंग’चे वाढते प्रकार बघता ‘लव्ह टू राईट’ सारख्या संस्थांची तरुणांना गरज असल्याचे चित्र आहे.