Mon, Aug 19, 2019 00:39होमपेज › Pune › पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जानेवारीत

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जानेवारीत

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:17AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ यंदा 11 ते 18 जानेवारी 2018 दरम्यान होणार असून, ‘तरुणाई’ ही या महोत्सवाची प्रमुख ‘थीम’ आहे. ‘पिफ’मध्ये समाविष्ट असलेल्या ‘वर्ल्ड कॉम्पिटिशन’ या विभागातील चित्रपटांची नावे महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
या विभागात 14 चित्रपटांचा समावेश आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या या महोत्सवात सहभागी होण्यासाठी 91 देशांमधून 1 हजार 8 चित्रपटांचे  अर्ज प्राप्त झाले होते. यातील निवडक असे 200 हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे.

महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, विश्‍वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्‍वस्त व निवड समिती सदस्य सतीश आळेकर, निवड समिती सदस्य व क्रिएटिव्ह हेड अभिजित रणदिवे, विश्‍वस्त सबिना संघवी या वेळी उपस्थित होते. महोत्सवातील चित्रपट सिटी प्राईड कोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, मंगला मल्टिप्लेक्स, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांसह पिंपरी-चिंचवडमधीलही एका चित्रपटगृहाचा समावेश आहे.