Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Pune › रिंग प्रकरणांची होणार चौकशी

रिंग प्रकरणांची होणार चौकशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

निविदाप्रक्रियेतील ‘रिंग’ प्रकरणामुळे सत्ताधार्‍यांनी महापालिकेची अब्रू वेशीवर टांगल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी मुख्य सभेत केली. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली, त्यावर याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिले. महापालिकेच्या निविदाप्रक्रियेत ठेकेदारांकडूनच रिंग केली जात असून, त्यात काही नगरसेवकांचे हितसंबंध असल्याचा प्रकार दै. ‘पुढारी’ने उजेडात आणला. त्यावर सत्ताधारी भाजपच्या वडगाव शेरीतील एका नगरसेविकेच्या पतीने निविदातील रिंग मोडली म्हणून ठेकेदाराला दमबाजी केल्याचे समोर आले.

हा प्रकारही दै.‘पुढारी’ने चव्हाट्यावर आणला. सोमवारी पालिकेच्या मुख्यसभेत याप्रकरणाचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नगरसेवकांनी या प्रकरणांवर आंदोलन करीत ‘रिंग’ करणार्‍यांची चौकशी करून त्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी नगरसेवक बाबूराव चांदेरे म्हणाले, की निविदा भरतानाच ठेकेदाराकडे दहा टक्के मागितले जातात, हे गंभीर प्रकार आहेत. संबंधित नगरसेवक कोणत्या पक्षाचा असो, त्याला योग्य ती समज देण्याची गरज आहे. सुभाष जगताप म्हणाले, की पारदर्शक कारभाराच्या मुद्यांवर पुणेकरांनी मते दिली. मात्र, त्याचा आता विसर पडलेला दिसतो. रिंग प्रकरणामुळे महापालिकेची अब्रू वेशीवर टांगल्याची टीका त्यांनी केली.

सुनील टिंगरे यांनी ज्या निविदांमध्ये रिंग झाल्याचे लक्षात येईल, अशा निविदा रद्द करून त्यांची फेरनिविदा मागविल्या पाहिजेत. तसेच काही कामांच्या निविदा अत्यंत कमी दराने येत आहेत, अशा कामांचा दर्जा तपासला पाहिजे,असे सांगितले. त्यावर महापौर टिळकयांनी निविदातील रिंग प्रकरणावर प्रशासनावर दबाव येत असेल, तर त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश दिले. दरम्यान, रिंग प्रकरणात सत्ताधारी भाजपला सभागृहात बॅकफूटवर जावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.