Wed, Jun 26, 2019 11:43होमपेज › Pune › तोरणागडावर जखमी पर्यटकाला जीवदान

तोरणागडावर जखमी पर्यटकाला जीवदान

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 1:21AM

बुकमार्क करा
विंझर : वार्ताहर 

तोरणा गडावर पर्यटनासाठी आठ पर्यटकांचा ग्रुप शनिवारी (दि. 13) दुपारी साडेतीन वाजता आला होता. यावेळी गडावरून खाली उतरताना खडकावरून पाय घसरल्याने एका पर्यटकाच्या डाव्या पायाच्या घोट्याला जबर दुखापत झाली, त्यामुळे पर्यटक जखमी झाला. या घटनेची माहिती कळताच वेल्ह्यातील स्थानिक मावळा जवान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावर धाव घेत तत्काळ जखमी पर्यटकाला तोरणा किल्ल्यावरुन झोळीत घालून खाली आणल्याने त्याला जीवदान मिळाले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आठ जणांचा ग्रुप राजगड किल्ल्यावर शुक्रवारी रात्री एक वाजता पर्यटनासाठी गेला होता. राजगड ते तोरणा हा ट्रेक करण्यासाठी शनिवारी सकाळी सात वाजता तोरण्याच्या दिशेने निघून दुपारी एक वाजता तोरणा गडावर पोहोचले. दुपारी साडेतीनच्या दरम्यान तोरणा गडावरून खाली उतरताना प्रकाश बाबाजी कदम (वय 45, रा. हिंगणे, सिंहगड रोड, पुणे) हा खडकावरून घसरून पडला. त्याच्या डाव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली. हाड मोडल्यामुळे त्याला हालचाल देखील करता येत नव्हती. त्यामुळे मदतीसाठी दूरध्वनीवरून रुग्णवाहिकेची मदत मागितली व काही मित्र खासगी वाहन पायथ्यापर्यंत आणण्यासाठी वेल्हे गावाकडे गेले.

अखेर वेल्ह्यातील स्थानिक मावळा जवान संघटनेचे ज्ञानेश्वर वेगरे, रामभाऊ राजीवडे, योगेश भोंडेकर, राजू गाडे, बापू धनावडे, संग्राम पवार, नवनाथ वेगरे, संपत पवार, आकाश बिरामणे हे तरुण रुग्णवाहिकेतील डॉ. राहुल बोरसे व चालक तुषार येनपुरे यांच्यासमवेत गडावर पोहोचले. डॉ. बोरसे यांनी जखमी तरुणावर प्रथमोपचार करून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास मेमाणे व अधिपरिचारिका शेखरे यांनी त्याची तपासणी केली. त्याच्या पायाला जबर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात 
पाठविण्यात आले.