Sun, Sep 23, 2018 04:23



होमपेज › Pune › 'मोदी सरकार काँग्रेसपेक्षा जास्त भ्रष्टाचारी'

'मोदी सरकार काँग्रेसपेक्षा जास्त भ्रष्टाचारी'

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 1:35AM



पुणे  : प्रतिनिधी

मोदी सरकारच्या कार्यकाळात न्यायव्यवस्थेवर दबाव टाकला जात आहे. न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी होऊ दिली जात नाही. त्यामुळे न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन लोकशाही संकटात आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात 126 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 54 हजार कोटींचा सौदा ठरला असताना संरक्षण मंत्रालय आणि वायूसेनेला विश्वासात न घेता मोदी सरकारने परस्पर फक्‍त 36 राफेल विमाने कोणतीही निविदा न काढता तिप्पट दराने खरेदी केली. त्यामुळे मोदी सरकार काँग्रेसपेक्षा अधिक भ्रष्टाचारी आहे, असा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी केला आहे. 

स्वराज अभियानातर्फे आयोजित समता स्वराज शिबिराचे उद्घाटन केल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी स्वराज अभियानाचे इब्राहिम खान, सुभाष लोमटे, अविक साहनी, ललित बाबर, अण्णासाहेब खंदारे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. भूषण म्हणाले, बोफोर्सचा घोटाळा 64 कोटींचा होता. मात्र, राफेल घोटाळा हजारो कोटींचा आहे. प्रश्न विचारणार्‍यांना शिवीगाळ केली जात आहे. पंतप्रधान स्वतः ट्रोल करणार्‍यांची फौज चालवित आहेत. त्यामुळे राज्यघटना धोक्यात आली असून, लोकशाही संस्था उद्ध्वस्त होत आहे. काँग्रेस सरकारने 126 राफेल विमानांच्या खरेदीसाठी निविदा काढली होती.

त्यापैकी अठरा तयार विमाने तत्काळ दिली जाणार होती, तर उर्वरित विमाने हिंदुस्थान ऐरोनॉटिक्सच्या कारखान्यात तयार केली जाणार होती. त्याचे तंत्रज्ञानही राफेल विमान कंपनीकडून हस्तांतरित केले जाणार होते. मात्र, मोदी सरकार आल्यावर या व्यवहारात परस्पर बदल करत तिप्पट दराने अवघ्या 36 विमान खरेदीचा निर्णय घेतला गेला. करारात हिंदुस्थान ऐरोनॉटिक्सच्या जागी अननुभवी रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनीचा समावेश करून त्यांना कोट्यवधींचे कंत्राट दिले गेले. लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी आंदोलन छेडले. त्यानंतर सत्तेत आलेल्या मोदी सरकारने चार वर्षे लोकपाल नियुक्‍ती केलेली नाही. त्यामुळे अण्णांनी पुन्हा भ्रष्टाचार, जातीयवादाविरोधात आंदोलन केल्यास त्याचे स्वागत करू, असेही प्रशांत भूषण यांनी सांगितले.