Wed, Jan 23, 2019 20:05होमपेज › Pune › सॅनिटरी नॅपकीनच्या विल्हेवाटीची यंत्रणा अपुरी

सॅनिटरी नॅपकीनच्या विल्हेवाटीची यंत्रणा अपुरी

Published On: Feb 27 2018 1:58AM | Last Updated: Feb 27 2018 12:29AMपुणे :  अपर्णा बडे

महिलांसाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या सॅनिटरी नॅपकीनच्या विल्हेवाटीबाबत सार्वजनिक स्तरावर फक्‍त12 ठिकाणीच यंत्रणा कार्यरत आहे. शहराच्या चाळीस लाख लोकसंख्येपैकी 13 ते 45 वयोगटातील महिलांची संख्या सुमारे 18 लाखांच्या आसपास असून, शहरात सॅनिटरी नॅपकीनचा दररोज तब्बल 10 ते 12 टनापेक्षा जास्त कचरा तयार होतो. दरम्यान, नॅपकीनच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक यंत्रणा अपुरी असल्याने शहरात नॅपकीनच्या कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. जिथे सॅनिटरी नॅपकीनच्या विल्हेवाटीची व्यवस्था अपुरी आहे; तिथे लहान मुलांच्या डायपरच्या विल्हेवाटीबद्दल तर कुठलीच स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात नाही.

महापालिकेद्वारे सार्वजनिक स्तरावर येरवडा क्षेत्रीय कार्यालय, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, औंध क्षेत्रीय कार्यालय, ढोलेपाटील रस्ता, पोलिस लाईन, कोथरूड, पेशवे उद्यान, कोरेगाव पार्क यांसह एकूण 12 ठिकाणी सॅनिटरी नॅपकीनच्या विल्हेवाटीसाठी यंत्रणा बसविण्यात आली आहे. सॅनिटरी नॅपकीनच्या विल्हेवाटीसाठी  ठिकठिकाणी  वेगळी यंत्रणा नसल्यामुळे ते सर्रास ओल्या कचर्‍यात टाकले जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

यामुळे अशा कचर्‍याची हाताळणी करणार्‍या कचरावेचकांना होणारा त्रास, नॅपकीन इतरत्र फेकल्यामुळे सांडपाण्यात अडकून तुंबणार्‍या नाल्यांचा प्रश्न अनुत्तरितच राहात आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये सॅनिटरी नॅपकीन नष्ट करण्याची क्षमता प्रतिदिवशी 800 ते 1000 एवढी  आहे. मात्र, शहरात दिवसेंदिवस सॅनिटरी नॅपकीनचा कचरा वाढत आहे. त्यामुळे ही यंत्रणा अत्यल्प क्षमतेची आणि अपुरी पडत आहे. 

दरम्यान, महापालिकेच्या अनास्थेमुळे सॅनिटरी कचरा विल्हेवाटीसाठी कुठलीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. महापालिकेत या प्रकल्पाबाबत आरोप-प्रत्यारोप, चर्चा करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र प्रकल्पांची अंमलबजावणी झालीच नाही; त्यामुळे वर्षानुवर्षे साठलेल्या  सॅनिटरी कचर्‍याची  विल्हेवाट लावण्यासाठी 12 मशिन्स सक्षम नाहीत, त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकानुसार प्रस्तावित प्रकल्पांची अंमलबजावणी होणार का, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे.