Tue, Mar 19, 2019 03:26होमपेज › Pune › आरटीओचा जीव रंगला  ‘जी फॉर्म’मध्ये

आरटीओचा जीव रंगला  ‘जी फॉर्म’मध्ये

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :नवनाथ शिंदे

 नागरिकांची कागदपत्रांच्या जोखडातून सुटका करण्यासाठी आरटीओतील बहुतांश कामकाज ऑनलाईन केले आहे. प्रत्यक्षात मात्र, कार्यालयात ऑफलाईन कागदपत्रे जमा करताना अनेक  रिक्षाचालकांना आर्थिंक फटका बसत आहे. सी-ब्लॉकमध्ये काम करणार्‍या एका ज्येष्ठ कर्मचार्‍याकडून चक्क रिक्षाचालकांच्या दुरुस्तीच्या अर्जावरही मलिदा खाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रिक्षा परवाना आणि बॅच व्हेरिफिकेशनचा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आरटीओ कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यासाठी जाणार्‍या रिक्षाचालकांकडून जी फॉर्मच्या सांकेतिक भाषेत पैशांची वसुली करण्यात येत आहे. रिक्षाचालकाकडून कागदपत्रांतील किरकोळ दुरुस्तीसाठी नारळ (शंभर रुपये) देण्याच्या मागणीची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; त्यामुळे कुंपणानेच शेत खाण्यास सुरुवात केली तर दाद मागायची कोणाकडे, असा सवाल रिक्षाचालकांनी विचारला आहे.

आरटीओ कार्यालयाच्या सी-ब्लॉकमध्ये रिक्षाचालकांचे बॅच व्हेरिफिकेशन, लायसन्स काढणे, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणे, लायसन्सचे नूतनीकरण करण्याचे काम केले जाते. दरम्यान काही दिवसांपासून सी ब्लॉकमध्ये काम करणार्‍या आरटीओ कर्मचार्‍यांच्या दिमतीला एजंटांची स्वारी दिसून येत आहे. त्यामुळे विभागात रिक्षांच्या विविध कामांसाठी विनाएजंट येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर कार्यालयाच्या सी विभागाची मदार सांभाळणार्‍या महिला कर्मचार्‍याकडून एजंटांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कार्यालयातील एका कर्मचार्‍याकडून  रिक्षांच्या विविध कामांसाठी विनाएजंट येणार्‍या नागरिकांची शंभर रुपयांची आर्थिंक लूट केली जात असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे, तर एजंटांमार्फत येणार्‍या रिक्षाचालकांची कामे प्राधान्याने केली जात आहेत. लायसन्स आणि बॅच व्हेरिफिकेशनच्या अर्जाची दुरुस्ती करण्यासाठी सी विभागात  गेलेल्या रिक्षाचालकाला कर्मचार्‍याकडून पैसे मागण्यात आले. त्या वेळी संबंधित रिक्षाचालकाने संघटनेच्या पदाधिकार्‍याला फोन लावला. त्या वेळी पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये झालेला संवाद...पदाधिकारी ः नमस्कार... साहेब कर्मचारी ः काय फॉर्म द्यायला सांगितलं का नाय (जी फॉर्म पैशांच्या देवाण-घेवाणीतील सांकेतिक भाषा) पदाधिकारी ः काय द्यायचा तुम्ही सांगा. कर्मचारी ः काय एखादा नारळ (शंभर रुपये) द्यायचा आणि अर्जावरील नंबर डिलीट मारून नवीन नंबरसाठी पैसे भरा. सांगा ना आता, द्यायला सांगा. पदाधिकारी  बरं देतो. संवाद झाल्यानंतर कर्मचार्‍याला शंभर रुपये देण्यात आले. त्यानंतर अर्जावरील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती संबंधित रिक्षाचालकाने दिली .